कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुंबई : मी माझ्या मूळ पक्षात परत येत आहे. त्यामुळे कोणाला अडचण होण्याचे कारण नाही. मंत्री हसन मुश्रीफ आणि माझ्यातले वैर संपले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवेळी ते दिसले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते संपवले आहे आणि येत्या काळात देखील आम्ही सोबत काम करु. आमचं को-ऑर्डिनेशन तुम्हाला येत्या काळात जिल्ह्यामध्ये दिसेल, असे समरजित घाटगे यांनी सांगितले.
समरजीत घाटगे आता घरवापसी करणार आहेत. ते बुधवारी मुंबईतील भाजप मुख्यालयात पुन्हा 'कमळ' हातात घेणार आहेत. यासंदर्भात समरजित घाटगे यांनी माध्यमांशी संवाद साधताना आगामी काळात कोल्हापूरमध्ये महायुतीच्या नेत्यांसोबत एकदिलाने काम करणार असल्याचे सांगितले.
भाजपमध्ये बरेच दिवस माझा भाजपप्रवेश पेंडिंग होता. नगरपालिका आणि विशेषत: जिल्हा परिषद निवडणुकीत आमचे कार्यकर्ते भाजपच्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी चर्चा करुन अधिवेशननंतर अधिकृत पक्षप्रवेश करण्यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली होती. त्यानंतरक माझा भाजप प्रवेश होतोय. माझ्या मूळ पक्षात परत आलोय याचं मला समाधान आणि अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया समरजीत घाटगे यांनी यापूर्वी दिली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझ्या थोरल्या भावासारखे आहेत, त्यांनी नेहमीच मला मार्गदर्शन केलं आहे. मी पक्षातून बाहेर पडल्यानंतर सुद्धा अनेकदा त्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मिळते, याचही समाधान असल्याचेही त्यांनी सांगितले .
या निर्णयापूर्वीच घाटगे यांनी शरद पवार यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यांनी सांगितले की, हा निर्णय त्यांनी कोणालाही न सांगता घेतलेला नसून, सर्व संबंधित नेत्यांना माहिती देऊनच पुढे पाऊल टाकले आहे. त्यामुळे या निर्णयाला राजकीय पारदर्शकतेची जोड मिळाल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, कोल्हापूरमधील स्थानिक राजकारणात घाटगे आणि मुश्रीफ यांची एकत्रित आघाडी यापूर्वीच प्रभावी ठरली होती. कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत या आघाडीने सर्व 23 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली होती. नगराध्यक्षपदी सविता माने यांची निवड झाली होती. या विजयामुळे दोन्ही नेत्यांच्या एकत्रित ताकदीला मतदारांनी मोठा पाठिंबा दिल्याचे स्पष्ट झाले होते.
मात्र, दुसरीकडे मुरगुड नगरपालिकेत या आघाडीला धक्का बसला होता. त्या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाने विजय मिळवत सत्ता हस्तगत केली. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची बनली आहेत. आता घाटगे यांच्या भाजपमध्ये पुनरागमनामुळे कोल्हापूरमध्ये महायुती अधिक बळकट होण्याची शक्यता असून, आगामी निवडणुकांमध्ये त्याचा मोठा परिणाम दिसू शकतो.
---------------------------------

