कोल्हापूर न्यूज / वि.रा.भोसले
गोकुळचे श्रीखंड मला खुप आवडतं.हो मलाही आवडते.पपड़ी ही टॅग लाईन आहे, गोकुळ उत्पादनाच्या जाहिरातीतील.प्रत्येक कुटुंबाचे अनेक सण गोकुळने गोड केले आहेत.आज गोकुळ दुसऱ्या क्रमांकाची आर्थिकदृष्ट्या संपन्न संस्था आहे.अर्थात याचा लाभ गोकुळच्या असंख्य दूध उत्पादकांना सुद्धा झाला पाहिजे.सध्या गोकुळच्या मालकीवरून किंवा सत्तेवरून विवाद सुरू आहेत. गोकुळच्या निवडणुका तोंडावर आल्या असतानाच गोकुळची चौकशी सुरू करण्याचे आदेशही आले आहेत.दीर्घ काळ प्रशासक सुद्धा येऊ शकेल.तोच त्या काळात गोकुळ चालवेल. संचालक मंडळ बरखास्त होईल.
खरं म्हणजे गोकुळ च्या दुधात मीठ टाकल्या सारखे होणार आहे. आनंदराव पाटील चुयेकर यांच्या स्मारकाला तडा जावा हे कुठल्याही सच्चा दूध उत्पादकाला खटकल्याशिवाय राहणार नाही.हे असं कसं असा प्रश्न पडेल.
आपण थोडे मागे जाऊ..कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ या नावाने 1963 ला ही संस्था सुरु झाली.गोकुळ शिरगांवच्या एम आय डी सी मध्ये संस्थेची प्रशस्त इमारत आहे. त्यामुळे संस्थेला गोकुळ असे नाव मिळाले. ते सार्थ व उचित वाटते.साधारण 62 वर्षात गोकुळ ने केलेल्या प्रगतीचा लेखाजोखा असा आहे. चुये ता करवीर चे आनंदराव पाटील चुयेकर यांनी ही संस्था स्थापन केली. त्यांना दुग्ध सागरातला कोलंबस असे म्हंटले तरी वावगे होणार नाही.सुरवातीला कांही हजारात असलेले दूध उत्पादक आता पाच लाखा पर्यंत पोचले आहेत व वार्षिक उलाढाल चार हजार कोटी रुपयांची आहे.
साखर कारखान्याप्रमाणे स्वतः दूध उत्पादक मतदान करत नाहीत. त्यांनी गावों गावी स्थापन केलेल्या दूध सोसायट्या मतदान करतात. म्हणजे त्या सोसायटीचे सर्व संचालक नसतात. ज्याच्या नावाचा ठराव असतो तो मतदार असतो.ही पद्धत सुटसुटीत वाटत असली तरी सत्ता काबीज करण्यासाठी एकदम सोपी आहे.ठराव धारकांना येन केन प्रकारे ताब्यात घेतले किंवा विश्वासात घेतले की झाले.राजकीय नेत्यांना हे अशक्य नसते. थोडक्यात ज्यांचे ठराव जास्त त्यांची सत्ता गोकुळवर येणार.
आनंदराव पाटील यांना सुरुवातीला बाळासाहेब माने व उदयसिंगराव गायकवाड या दोन खासदारांनी मदत केली. दोन्ही खासदारांचा स्वतः चा त्यात भाग नव्हता. फक्त बाहेरून मदत. चुयेकरना मोठी ताकद मिळत असे. पण हे फार काळ टिकले नाही.
म.न.पा गटाने म्हणजे महाडिक, नरके पाटील (पी एन ) गटाने गोकुळची सत्ता हस्तगत केली आणि कित्येक वर्षे त्यांच्याच ताब्यात राहिली. गोकुळ म्हणजे आर्थिक कमाईचा मोठा श्रोत होता. पक्षीय राजकारणात तोटाच जास्त असल्याने आमदारकी पेक्षा गोकुळ चे संचालक पद चांगले वाटू लागले.
पुढे ना. मुश्रीफ आणि सतेज पाटील युतीने हा गड जिंकला.दोन्ही सत्ता मध्ये एक फरक पहायला मिळाला. पहिल्या सत्तेत गोपाळची एंट्री झाली होती.ती गोकुळच्या सभासदांना आवडली नव्हती.नव्या सत्तेत तसे कांही दिसत नाही. ना. मुश्रीफ हे युती सरकारचे मंत्री आहेत आणि सतेज उर्फ बंटी पाटील हे कॉग्रेस पक्षाचे असून युतीचे कट्टर विरोधक आहेत.त्यामुळे सद्याची सत्ता म्हणजे विळ्या भोपळ्याचे सख्य आहे.युतीला ते सख्य जाचणार आहे. अमूल सारखी गोकुळ ही मोठी संस्था असून सद्या दुसऱ्या क्रमांकावर आहे.आणि तिची सत्ता सरकारच्या सावलीतच नाही म्हणजे काय!
कारभाराचे म्हणाल तर सद्याच्या गोकुळ मध्ये बाहेरून कोणाचे आक्रमण नाही. नाविद मुश्रीफ यांना प्रामाणिक पणे काम करण्याची संधी मिळाली आहे व विश्वास पाटील, अरुण डोंगळे अभिजित तायशेट्ये, अजित नरके, शशिकांत पाटील चुयेकर इत्यादी जेष्ठ संचालक त्यांना साथ देत आहेत.सर्व चोवीस पंचवीस संचालकांनी पारदर्शक कारभारासाठी नाविद ना साथ दिली तर हा संघ दोन नंबर चे स्थान राखून ठेवेल.मदर डेअरी, पराग डेअरी, गोवर्धन हे नामवंत संघ गोकुळशी स्पर्धा करायला संधीची वाट पहात आहेत. सत्ता कोणाकडे ही जाऊदे पण श्रीखंडाची चव बदलून चालणार नाही.
शाहू ग्रुपचा सुद्धा स्वातंत्र दुग्ध व्यवसाय आहे. त्या ग्रुप चे सर्वेसर्वा समरजितसिंह घाटगे यांनी नुकतीच भाजपात प्रवेश केला आहे. मुश्रीफ आणि आपण एकत्र आलो आहोत असे त्यांनी कितीही पटवून सांगण्याचा प्रयत्न केला तरी राजकारणात कोण कोणाचा मित्र किंवा शत्रू नसतो याचा प्रत्यय कांही दिवसात येऊ शकेल इतक्या वेगाने गोकुळ मधील घडामोडी होत आहेत.
भाजपात तोबा गर्दी झाली आहे असे विरोधक ही मान्य करतात. भाजपा च्या बस मधून समरजितसिंह खिडकीला धरून प्रवास करतील असे सतेज पाटील म्हणतात.कोणी काय प्रतिकिया देईल याकडे भाजपाचे लक्ष नाही.सबका साथ सबका विश्वास यासाठी एकहाती सत्तेची गरज असते. येणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकात सुद्धा भाजपा ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात आहे.त्यामुळे महाराष्ट्रातील गोकुळ सारख्या संस्था पण भाजपा किंवा युतीच्या छत्राखालीच राहिल्या पाहिजेत असे धोरण ही असेल.
ना मुश्रीफ यांच्या सारख्या मुरब्बी नेत्यांचे सहकार्य तर हवेचं पण मैदान आमचे आणि शड्डू ही आमचाच घुमला पाहिजे ही युतीची राजनीती असावी. गोकुळचे श्रीखंड प्रत्येकाला हवे असले तरी एक गोष्ट मात्र नक्की की , गोकुळ ची मालकी कोणा एकट्याची किंवा चोवीस संचलकांची सुद्धा नाही.कोणत्या पक्षाची,युतीची किंवा आघाडीची नाही.गोकुळची मालकी ही पाच लाख उत्पादकांची आहे. श्रीखंड, बासुंदी वर सुद्धा आधी त्यांचाच हक्क आहे.
---------------------------

