शासना मार्फत घेतल्या जाणाऱ्या पटपडताळणीस शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघ यांचा तीव्र विरोध : पटपडताळणी पुढे ढकलण्याबाबत लेखी निवेदन

Kolhapur news
By -

 

            


         कोल्हापूर न्यूज नेटवर्क  


       कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ कोल्हापूर व जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, कोल्हापूर यांच्या वतीने कोल्हापूर विभागाच्या शिक्षण उपसंचालक  प्रभावती कोळेकर व माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांना राज्यातील शाळांची पटपडताळणी पुढे ढकलण्याबाबत लेखी निवेदन देण्यात आले.


    लेखी निवेदनातील विषय असा की, उपरोक्त विषय व संदर्भाकित पत्रानुसार आपण राज्यातील शाळांची पटपडताळणी दिनांक ११, १५ व २२ एप्रिल रोजी पॅट परीक्षेच्या दरम्यान आयोजित केलेली आहे. तसेच त्या दिवशी इयत्ता ९ वी व इयत्ता ११ वी च्या विशिष्ट विषयांच्या परीक्षा घेण्याबाबतही सूचना दिलेल्या आहेत.


परंतु अनेक शाळांनी यापूर्वीच आपल्या स्तरावर इयत्ता ९ वी व इयत्ता ११ वी च्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करून विद्यार्थ्यांना दिलेले आहे. काही शाळांमध्ये या वर्गाच्या परीक्षा १ ते १० एप्रिल दरम्यान पूर्ण करून, त्यानंतर इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी जादा तास सुरू करण्याचे नियोजन केलेले आहे. 


    एप्रिल महिन्यात घेतल्या जाणाऱ्या या जादा तासांमुळे इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी च्या विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीत अभ्यास करण्यास मोठी मदत होते व त्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना मिळते. अशा परिस्थितीत सध्याच्या नियोजनात तातडीने बदल करणे शाळांसाठी अत्यंत कठीण आहे.तसेच शैक्षणिक वर्षाच्या शेवटी पटपडताळणी करणेही व्यवहार्य व सोयीचे नाही. म्हणून आपणास नम्र विनंती आहे की, सदर पटपडताळणी पुढील शैक्षणिक वर्षात सप्टेंबर महिन्यात आयोजित करण्यात यावी. आपण या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार कराल ही अपेक्षा. 


     शिक्षण उपसंचालक यांना  लेखी निवेदन देतांना उपस्थित शिष्टमंडळात शिक्षक आमदार जयंत आसगावकर,शैक्षणिक व्यासपीठ अध्यक्ष एस. डी. लाड, शिक्षक नेते दादासाहेब लाड,मुख्याध्यापक संघ चेअरमन राहूल पवार,सचिव आर. वाय. पाटील, उपाध्यक्ष रवींद्र मोरे, सुधाकर निर्मळे,श्रीकांत पाटील, एम. जी. पाटील, संदीप पाथरे, एस. के. पाटील आदीसह अन्य शिक्षक शिक्षकेत्तर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

  

         ---------------------------------

                    

पटपडताळणीस शिक्षण विभाग सोडून अन्य विभागातील अधिकारी शाळेत आले असता  त्यांना पटपडताळीस विरोध करा असा इशारा शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी दिला. 


         -----------------------------------


शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांना  लेखी निवेदन देतांना  शिक्षक आमदार जयंत आसगावकर,शैक्षणिक व्यासपीठ अध्यक्ष एस. डी. लाड, शिक्षक नेते दादासाहेब लाड,मुख्याध्यापक संघ चेअरमन राहूल पवार,सचिव आर. वाय. पाटील आदीसह अन्य मान्यवर.



             ----------------------------