कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुंबईतील भाजप मुख्यालयात शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी मंत्री चंद्रकांत पाटील आणि रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी अधिकृत प्रवेश केला. या निर्णयापूर्वी आपण शरद पवारांना सांगूनच पाऊल उचलल्याचेही घाटगे यांनी स्पष्ट केले होते.
घाटगेंच्या या पुनरागमनावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मते, घाटगे हे मुळात भाजपचेच होते आणि फक्त तिकीटासाठी राष्ट्रवादीत आले होते. आता त्यांची परतफेरी ही केवळ वैयक्तिक राजकीय सोय नसून मोठा राजकीय संकेत आहे. विशेषतः कोल्हापूरमधील नेते हसन मुश्रीफ यांच्यासाठी ही धोक्याची घंटा असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
भाजप स्वबळाच्या तयारीत - शशिकांत शिंदे
शशिकांत शिंदे पुढे म्हणाले की, घाटगेंना पुन्हा भाजपमध्ये घेणे म्हणजे मित्रपक्षांना स्पष्ट संदेश देणे आहे. भाजप येत्या काळात स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या तयारीत आहे आणि त्यासाठी अशा नेत्यांची गरज आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यात दिलेला स्वबळाचा संदेश आता प्रत्यक्षात उतरवण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे महायुतीतील इतर पक्षांनीही या घडामोडी गांभीर्याने घ्याव्यात, असे शिंदेंनी सूचित केले.
घाटगे खिडकीला लटकून जात आहेत- सतेज पाटील
दरम्यान, काँग्रेसकडूनही या घडामोडींवर प्रतिक्रिया उमटली आहे. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी घाटगेंच्या भाजप प्रवेशावर टोला लगावला. भाजपच्या गाडीत जागा नाही, तरीही घाटगे खिडकीला लटकून जात आहेत, अशा शब्दांत त्यांनी टीका केली. या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. घाटगेंच्या पुनरागमनामुळे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः 2029 च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र दिसत आहे.
------------------------------

