कोल्हापूर : चाटक्या जिभेची खवय्ये नगरी

Kolhapur news
By -

 

         

      



                      कोल्हापूर न्यूज नेटवर्क



कोल्हापूरचा चहा : 


कसा आकडी दुधाचा, साखर अन् वेलचीपूड घालून आठवलेला, वाफाळलेला सुमधुर, फिकट नारंगी रंगाचा


कोल्हापूरचे भजी : 


कसे  खरबरीत बेसन पीठाचे ... ओल्या पीठात इंचभर सडसडीत हिरवी मिरची घालून मध्यम ज्योतीवर तेलात चांगले भाजलेले, कडकडीत अन् खुसखुशीत भाजलेले पिवळसर


   कोल्हापूरचा वडा कसा : 


मसालेदार पिवळी बटाट्याची भाजी घालून खरबरीत बेसन पीठात खरपूस भाजलेला पण पिवळसरच, हातात कसातरी मावेल इतका ....पाहता क्षणीच जिभेला पाणी सुटणारा, पोटाची आग किमान चार तास तरी शमवणारा कडकडीत अन् खुसखुशीत 


    कोल्हापूरची भेळ कशी : 


कुरकुरीत चिरमुऱ्याची- भंडंगाची, शेव-पापडी-मसाले शेंगदाणे -खारीडाळ बारीक कांदा कोथिंबीरीची, त्यात चिंच- गुळ-खजूर-लवंगपूड-वेलचीपूड घालून तयार केलेल्या कोळची, हे सर्व मिश्रण काही सेकंदच मणगटाची पूर्ण ताकद लावून गतीने हालवून तयार झालेली भेळ. वरून बारीक कांदा आणि बारीक शेव मारून तयार झालेली ओली पण कुरकुरीत, चटकदार भेळ 


आता राहिलं काय बर....?


हां.... कोल्हापूरचा तांबडा-पाढरा रस्सा !


   तांबडा रस्सा कसा :


रंग बघूनच घाम सुटणारा... बेडगी मिरची पासून तयार केलेली कांदा लसूण चटणी घातलेला.... ओलं खोबरं -आलं-लसूण-कांदा-टामॅटो- कोथिंबीर घालून तयार केलेला ओला मसाला... याला बारीक कांद्याची चांगली फोडणी देऊन त्यात मटणाचे सूप घालून उकळेला तांबडा रस्सा. दिसताना भडक दिसणारा पण तिखट नसलेला...जिभेवर रेंगाळणारा.... कितीही प्या जराही त्रास न होणारा तांबडा रस्सा असाच कोल्हापूरी माणूस  वरून रागीट वाटणारा पण मनाने कोमल असणारा... प्रेमळ... विनम्र.....मदतीला धावणारा.....


 पांढरा रस्सा कसा :


प्रथम दर्शनीच मटणाचा अन् पांढरा रस्सा कसा असं आश्चर्य वाटणारा....?  हळद न घातलेलं सूप. काजू-मगज बी-बदाम-वेवदोडे घालून तयार केलेली पेस्ट.... लवंग -डालचिनीची फोडणी.... त्यात पेस्ट, सूप आणि ओल्या खोबऱ्याचे दूध घालून उकळी येऊ न देता गरम करून तयार झालेला, जराही तिखट नसलेला पांढरा रस्सा... कितीही प्या, पुन्हा पुन्हा प्यावासा वाटणारा पांढरा रस्सा 


तर बहिणीनो आणि भावांनो  आजच येताय ना कोल्हापूरला खवय्यांच्या नगरीत, यायलाच पाहिजे !


                   -  भारतभूषण  गिरी



            ****************