कोल्हापूर न्यूज / वि. रा. भोसले
मागील एका लेखांमध्ये 'कोल्हापूर न्यूज नेटवर्क'च्या माध्यमातून सर्व दूध उत्पादकांच्या इच्छा आकांक्षाचा लेखा जोखा मांडला होता.
पाच लाख दूध उत्पादक आणि चार हजार कोटींचे खेळते भांडवल असलेल्या गोकुळचा लाभ दूध उत्पादकांना किती मिळतो असा सवाल आम्ही विचारला होता.आज ठरावावर निवडून येणारे संचालक हमरी तुमरीवर आले आहेत. नुसत्या कागदावरच असलेल्या अनेक दूध सोसायट्या संचालकांची बाजू घेऊन आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. गोकुळ वर प्रशासक आल्यामुळे त्यांची पंचाईत झाली आहे.
गोकुळच्या राजकारणात सतेज उर्फ बंटी पाटील , नामदार हसन मुश्रीफ,धनंजय महाडिक, अमल महाडिक, शिवाजी पाटील या नेत्यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. निवडणुकीची ठराव पद्धतीच त्याला कारणीभूत आहे. ठरावासाठी गावा गावात दूध सोसायट्या झाल्या. सोसायट्यांची नावे सुद्धा एकसारखीच. म्हणजे कोणीकडून ठराव संख्या वाढवणे हाच उद्देश.
ठरावांचे गणित मांडणारे नेते सुद्धा तितकेच हुशार. विधान सभेच्या निवडणुकीत ज्यांनी मदत केली त्यांच्याकडे किती मते आहेत याचे गणित मांडणाऱ्यांनी गोकुळच्या निवडणुकीत लगेच पाटी पुसली आणि ठरावांचे गणित मांडले.निष्ठा, विश्वास नावाच्या पताका वेशीवर टांगून ठेवल्या. वारा कसा सुटेल तसे त्यांचे फक्त कापड बदलायचे. हे मुद्दाम मांडावेसे वाटते कारण संचालकांना दूध उत्पादकांच्या नफा तोट्याशी काही देणे घेणे नसते.त्यांनी गाई, म्हशी पाळायच्या, पासुखाद्य व कडबा कुटी संघाकडूनच विकत आणायचे. पहाटे पासून ते रात्री अंथरुणावर पडे पर्यंत "माझी गायरं माझी म्हसरं " म्हणत काबाड कष्ट करत दूध धंदा करायचा. दहा तारखेला डेरीत जाऊन बील मागायचं. दुधाचे मालक असूनही मजूर असल्यासारखा धंदा करायचा. उत्पादकांची आजची स्थिती पाहिली की 'धंदा' हाच शब्द योग्य वाटतो. त्याला व्यवसाय असा सुसंस्कृत शब्द वापरायला भीती वाटते.
संचालक मात्र 'दुग्ध व्यवसाय' हुशारीने करतात.स्वतः साठी आपल्या पोराबाळांसाठी.शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे तो जगला पाहिजे, वाढला पाहिजे अशी भाषणे संचालकांनी फक्त स्टेज वरून करायची. त्यांच्या साठी मोर्चे, आंदोलने तेवढी राजू शेट्टीने करायची.
दूध उत्पादकांची आजची अवस्था अशीच आहे. त्याने श्रीखंड, बासुंदी फक्त दिवाळीला चाखायचे किंवा जाहिराती बघून तोंडाला सुटलेले पाणी आतल्या आत गिळायचे.ज्यांनी गोकुळ स्थापिले ते जवळ जवळ नामशेष झाले. जे गोकुळ चालवतात ते मात्र अवघ्या जिल्ह्यावर राज्य करतात. दूध उत्पदाकांना आपले प्रतिनिधी निवडण्याचा सुद्धा अधिकार असू नये ही लोकशाही ची क्रूर थट्टा आहे.
सतेज पाटील, अमल व धनंजय महाडिक, शिवाजी पाटील, हसन मुश्रीफ हे केंव्हा एक होतील हे सांगता येत नाही. त्यांना फक्त सहज मिळू शकेल अशा 'संचालक पदा' त इंटरेस्ट आहे. मग ते युतीकडून असो नाही तर आघाडी कडून.गोकुळ चे संचालक मूठभर ठरावातून नव्हे तर पाच लाख दूध उत्पादकांमधून निवडून दिले जावेत. एका खासदारकीच्या निवडणुकी पेक्षा कमी खर्चात ती निवडणूक होऊ शकेल. साखर कारखान्यासारखी.
---------------------------

