सोमवार 18 मे रोजी हातकणंगलेत लोकशाही दिन : नागरिकांनी तक्रारी मांडाव्यात - तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर.

Kolhapur news
By -

 

                        


                   कोल्हापूर न्यूज नेटवर्क    

                               

                    हेरले  /  प्रतिनिधी


      महाराष्ट्र शासनाच्या संकल्पनेतून नागरिकांच्या विविध शासकीय अडचणी, तक्रारी व प्रलंबित प्रश्नांना तातडीने न्याय मिळावा, प्रशासन अधिक लोकाभिमुख व्हावे आणि सामान्य नागरिकांना थेट प्रशासनापर्यंत आपली भूमिका मांडण्याची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने सोमवार दिनांक 18 मे 2026 रोजी सकाळी ठीक 11 वाजता हातकणंगले येथील तहसील कार्यालयात तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

     या लोकशाही दिनात महसूल, ग्रामविकास, नगरपंचायत, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य, शिक्षण, सामाजिक न्याय, कृषी, सार्वजनिक बांधकाम, पोलीस प्रशासन तसेच इतर विविध शासकीय विभागांशी संबंधित नागरिकांच्या तक्रारी, समस्या थेट संबंधित अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असून, अनेक प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले जाणार आहेत.


    तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “लोकशाही दिन हा प्रशासन आणि सामान्य नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ करणारा उपक्रम आहे. नागरिकांनी आपल्या अडचणी, तक्रारी अथवा प्रलंबित विषय आवश्यक कागदपत्रांसह मांडावेत. प्रशासन नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असून,  तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली जाईल.”


      तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने नागरिकांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील भूमिका घेतली असून, लोकशाही दिनाच्या माध्यमातून अनेक प्रलंबित प्रश्नांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून शासनाच्या या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


      -----------------------