मुंबईत मुसळधार पावसात शिक्षकांचे 'भीक मांगो' आंदोलन

Kolhapur news
By -

 


               



                  कोल्हापूर न्यूज नेटवर्क   


 महाराष्ट्र राज्य पेन्शन ग्रस्त शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने ६ रोजी मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदानावर हजारो शिक्षकांनी एकत्र येत अत्यंत तीव्र स्वरूपाचे 'भीक मांगो' आंदोलन केले. 



सकाळीच दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या रद्द झाल्या. पुणे रेल्वे स्टेशन येथे मराठावाडा विभागाचे शिक्षक आमदार  विक्रम काळे यांना  सेवा निवृत्त पेन्शन पीडित बांधवांनी घेराव घालत भीक मांगो आंदोलन करत, जुन्या पेन्शनच्या घोषणा देत त्यांना पेन्शनची भीक मागितली. आयुष्यभर ज्यांनी समाजाला घडवले, त्यांनाच आज वृद्धापकाळाच्या सुरक्षेसाठी हात पसरण्याची वेळ सरकारने आणली आहे," अशा तीव्र भावना आंदोलक शिक्षकांनी आझाद मैदानावर व्यक्त केल्या. दिवसभर सुरू असलेल्या मुसळधार पावसात आणि चिखलात उभे राहून शिक्षकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

 


आंदोलनाला ​आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून शिक्षकांना मार्गदर्शन केले आणि हा लढा अंतिम टप्प्यापर्यंत नेण्याचा निर्धार व्यक्त केला.​आमदार सुधाकर अडाबाले  यांनीही आंदोलनाला प्रत्यक्ष भेट देऊन शिक्षकांचे मनोधैर्य वाढवले.आंदोलनाची तीव्रता आणि शिक्षकांचा वाढता रोष पाहता, दुपारी ठीक ३ वाजता राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी आझाद मैदानावरील आंदोलनस्थळी धाव घेतली. त्यांनी आंदोलक शिक्षकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या संघटनेचे राज्य अध्यक्ष विजय शिरोळकर यांनी सविस्तर माहिती देऊन निवेदन दिले. 



या संदर्भात संघटनेसोबत बैठक घेऊन पुरावे सादर केल्यास या प्रश्नावर मी स्वतः लक्ष घालतअसून मुख्यमंत्र्यांसोबत जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावर सविस्तर विशेष बैठकीचे आयोजन केले जाईल," असे आश्वासन यावेळी दिले.​मंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन तूर्तास शांत झाले असले, तरी शिक्षकांनी भविष्यात आंदोलन आणखी तीव्र करू असा सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे. आता सरकार यावर नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्व शिक्षकांचे लक्ष लागले आहे. या आंदोलनास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो बांधव उपस्थित होते.


             ------------------------