मुरगूडच्या तरुणांकडून वेदगंगा घाटाची स्वच्छता.५०० हून अधिक दारूच्या बाटल्या, ट्रॉलीभर कचरा. गतवर्षीच्या गणेश मूर्ती पुन्हा विसर्जित.

Kolhapur news
By -

 


                        


           



                     कोल्हापूर न्युज नेटवर्क
 


 मुरगूड येथील सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या तरुणांनी वेदगंगा  घाटाची  स्वच्छता मोहीम राबवत पर्यावरण संवर्धनाचा आदर्श घालून दिला. 



    गेल्या आठवड्यात शहरातील तलाव स्वच्छ केल्यानंतर वेदगंगा नदी घाट, नदीपात्र आणि ओढा परिसर स्वच्छ करण्याचा संकल्प तरुणांनी केला होता. त्यानुसार आज सुमारे दोन तास अथक परिश्रम घेत ही मोहीम यशस्वीपणे पार पडली.



    या मोहिमेदरम्यान  परिसरातून तब्बल ५०० हून अधिक दारूच्या रिकाम्या बाटल्या, २०० पेक्षा अधिक शीतपेयांच्या बाटल्या तसेच मोठ्या प्रमाणात साचलेला प्लास्टिक व इतर कचरा गोळा करण्यात आला. एकूण ट्रॉलीभर कचरा हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला.


    यावेळी नदीकाठी गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवानंतर आणून ठेवलेल्या गणपती व गौरीच्या मूर्तीही आढळून आल्या. मूर्तींची विटंबना होऊ नये या भावनेतून तरुणांनी त्या विधिवत पाण्यात विसर्जित केल्या.



    या स्वच्छता मोहिमेत सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट, ओंकार पोतदार, तानाजी भराडे, संकेत शहा, प्रफुल्ल कांबळे, गणेश भाट, वेदांत मंडलिक यांच्यासह अनेक तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनीही नदीकाठी कचरा व मद्याच्या बाटल्या टाकू नयेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.  या युवकांचे नागरिकांकडून व प्रशासनाकडूनही कौतुक होत आहे.





                        ---------------------------