कोल्हापूर शिक्षण विभागाच्या विभाग स्तरीय आढावा बैठकीत शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांनी संच मान्यता, वेतन निश्चिती, अंशतः आणि पूर्णतः अनुदानाची प्रक्रिया, एक पेड माँ के नाम उपक्रमांचा घेतला आढावा

Kolhapur news
By -

      





                   कोल्हापूर न्यूज नेटवर्क


         कोल्हापूर  शिक्षण विभागाच्या विभाग स्तरीय आढावा बैठकीत शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांनी संच मान्यता, वेतन निश्चिती, अंशतः आणि पूर्णतः अनुदानाची प्रक्रिया, एक पेड माँ के नाम उपक्रमाचा आढावा घेतला.इतर प्रशासकीय शैक्षणिक गुणवत्तेचे सादरीकरण व पुढील वर्षभरात करावयाची कार्यवाही तसेच प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेवून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शैक्षणिक बाबींवर चर्चा करण्यात आली.पन्हाळा येथील संजीवन शिक्षण समूहामध्ये ही आढावा बैठक संपन्न झाली.या बैठकीच्या प्रमुख स्थानी शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर होत्या.


     यावेळी शैक्षणिक स्वास्थ्य उपक्रमामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा महाराष्ट्रात प्रथम आणि भारतात द्वितीय क्रमांक आल्याबद्दल कोल्हापूर, सातारा, सांगली,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अधिकारी तसेच डाएटचे प्राचार्य यांचा सन्मान श्रीमती प्रभावती कोळेकर यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी कोल्हापूर डाएटचे प्राचार्य डॉ. रमेश होसकोटी, सांगली डायटचे प्राचार्य डॉ. विकास सलगर, सातारा डाएटचे प्राचार्य जितेंद्र साळुंखे, सिंधुदुर्ग डायटचे प्राचार्य राजेंद्र कांबळे, रत्नागिरी डाएटचे प्राचार्य सुशील शिवलकर हे मान्यवर उपस्थित होते.


   त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित केलेल्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील स्कॉलरशिप परीक्षेमध्ये इयत्ता पाचवी आणि आठवी मधील शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सर्वाधिक संख्येने उत्तीर्ण झालेल्या जिल्हा निहाय तालुका गटशिक्षण अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आली. स्वागत व प्रास्ताविक संजीवन शिक्षण समूहाचे सहसचिव एन. आर. भोसले यांनी केले.


     या बैठकीस शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, डॉ. मीना शेंडकर, अनुराधा म्हेत्रे,के. एच. शिंदे,राजेसाहेब लोंढे, महेश धोत्रे, नानाभाऊ हजारे, अनिस नायकवडी, धनंजय चोपडे, शबनम मुजावर, किरण लोहार, दीपक मेंगाणे, सविता परब, विनायक पाटील, अहमदी फारूखी आदी प्राथमिक, माध्यमिक, योजना शिक्षणाधिकारीसह पाच जिल्ह्यातील प्राथमिक गट शिक्षणाधिकारी आणि शिक्षण विभागातील वेतन / लेखा विभागातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.


   या आढावा बैठकीचे आयोजन कनिष्ठ प्रशासन अधिकारी उपसंचालक कार्यालय कोल्हापूरचे समरजीत पाटील, प्रमोद महिंदरकर, इम्रान काझी व राहूल मसने आणि त्यांच्या विभागातील पदाधिकाऱ्यांनी केले होते. त्यांना संजीवन विद्यानिकेतनचे कलाशिक्षक नितीन गावडे, संगीत शिक्षक मंगेश पैंजणे, राज खोत, अमित कल्याणकर यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन महेंद्र कुलकर्णी यांनी केले तर आभार समरजीत पाटील यांनी केले.








                  



                 ------------------------------