कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड येथील सरपिराजीराव तलावाच्या सांडव्यावर ओव्हर ब्रिज व्हावा अशी मागणी करत येथील कृति समितीने 9 ऑगस्ट या क्रांतिदिना दिवशी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा एका निवेदना द्वारे दिला आहे.
मुरगूड पोलीस ठाण्याला दिलेल्या या निवेदनात ओव्हर ब्रिज ची नितांत गरज असल्याचे म्हंटले असून अनेक वेळा मागणी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे.
हा पूल केवळ रस्त्यालाच नव्हे तर मुरगूड,दौलतवाडी करं जीवणे येथील ग्रामस्थ, शेतकरी, कामकरी, व्यापारी, यांच्या भाव भावनांनासुद्धा जोडणारा आहे.
मुरगूड शहाराशी जिव्हाळ्याचे संबंध असलेल्या या गावांच्या नागरिकांचे दैनंदिन जीवन सुद्धा या पुलामुळे सुसह्य होणार आहे.
निपाणी गडहिंग्लज हा राज्य रस्ता करण्याचे काम सद्या सुरु आहे मग या पुलाचे काम रेंगाळ ण्याचे चे कारण काय असा सवाल सुद्धा नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
या पुलाच्या मागणीसाठी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ, आरोग्य मंत्री तथा पालक मंत्री ना. प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी, तलाठी व इतर प्रशासकीय अधिकारी यांना निवेदने दिली आहेत.
राज्य मार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीने 12 कोटी निधीची गरज असल्याचे म्हंटले आहे. निधी अभावी पुलाचे काम ठप्प असून सांडव्याच्या दोन्ही बाजूचे काम मात्र सुरु आहे.
पावसाळ्यात सांडव्यावर तलावाचे पाणी येते व त्यामुळे शेवाळ माजून अनेक अपघात होत असतात.सांडव्याची मालकी, परवानगी इत्यादी कांही तांत्रिक अडचणी असतील तर त्या समन्वयाने मिटू शकतात.
विद्यार्थी स्कूल बसेस, एस टी बसेस, उसवाहतूक वाहने, बैलगाड्या, रुग्णवहीका अशी अविरत वाहतूक या रस्त्यावरून होत असते. निपाणी, गडहिंगलज कडे जाणारा हा राज्यमार्ग आहे.त्यामुळे या पुलाकडे दुर्लक्ष होणे ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
----------------------

