कोल्हापूर न्यूज नेटवर्क
सायबर भामट्याच्या आर्थिक फसवणुकीला बळी पडलेल्या व्यक्तीला कोल्हापूर सायबर पोलिसांनी मोठा दिलासा दिला आहे. सायबर पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे तब्बल २२ लाख रुपयांची फसवणूक झालेली संपूर्ण रक्कम अवघ्या आठ दिवसांत परत मिळवून देण्यात यश आले आहे. या कारवाईमुळे ऑनलाइन फसवणूक झाल्यानंतर तातडीने पोलिसांकडे तक्रार करण्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.
दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी तक्रारदार प्रमोद चौगुले रा. कोल्हापूर यांनी ऑनलाइन आर्थिक फसवणुकीबाबत कोल्हापूर सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या खात्यातून सुमारे २२ लाख रुपयांची रक्कम ऑनलाइन फसवणुकीच्या माध्यमातून परस्पर हस्तांतरित झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या सूचनेनुसार तसेच अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली.सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हारुगडे व अंमलदारांनी तात्काळ कार्यवाही सुरू केली. फसवणुकीची तक्रार National Cyber Crime Reporting Portal (NCRP) वर नोंदविण्यात आली. त्यानंतर संबंधित बँका व वित्तीय संस्थांशी तातडीने समन्वय साधून फसवणुकीच्या रकमेचा मागोवा घेण्यात आला.
फसवणुकीच्या रकमेतील पुढील व्यवहार रोखण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली. संबंधित बँकिंग यंत्रणेशी सातत्याने पाठपुरावा करत पोलिसांनी तक्रारदाराची फसवणुकीत गेलेली तब्बल २२ लाख रुपयांची संपूर्ण रक्कम अवघ्या आठ दिवसांत परत मिळवून दिली.
सायबर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक नीलोत्पल आणि अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक संजय हारुगडे, पोलीस उपनिरीक्षक अतिश मेत्रे, सहा. पो. फौजदार राजेंद्र ताटे, मिनाक्षी पाटील, पोलीस हवालदार सचिन देसाई, अमर आडसुळे, सागर माळवे, अमरसिंह वासुदेव, सुरेश राठोड, सुकुमार जाधव, रविंद्र पाटील, संगीता खोत, पोलीस अंमलदार अजय सावंत, विनायक बाबर, ऋषिकेश खोत, रोहित शिंदे, पल्लवी मोहिते यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
सायबर फसवणूक झाल्यानंतर वेळ न दवडता राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाइन क्रमांक १९३० वर तक्रार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोल्हापूर सायबर पोलिसांनी नागरिकांना सायबर फसवणूक झाल्यानंतर लगेचच संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
----------------------------

