कन्हैया,मी निर्माण केलेलं गोकुळ पृथ्वीवर कुठे आहे हे मला जरा दाखवशील.? स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर : गोकुळ चे आजचे चित्र.

Kolhapur news
By -

 

                


               कोल्हापूर न्यूज  / वि.रा.भोसले



गोकुळचे संस्थापक आनंदराव पाटील,चुयेकर यांनी गावागावात फिरून दूध संकलनासाठी हयात घालवली.गोकुळ शिरगावच्या एमआयडीसीत तितक्याच समर्पक नावाने गोकुळदूध संघ सुरू केला.चुयेकरांनी गुजरात मधून दूध उत्पादकांना गाई आणून दिल्या.बँका मार्फत कर्जे उपलब्ध करून दिली.गावागावात गाई म्हशींचे शेकडो गॊठे तयार झाले.दूध संकलन सुरू झाले. आज दूध संघाची 4000 कोटींच्या वर उलाढाल आहे. पाच हजारांच्या वर दूध उत्पादक संस्था (डेऱ्या )आहेत.गोकुळ संघ चालवणारे 25 संचालक निवडून येणारे व तीन स्विकृत असे 28 संचालक गोकुळ चालवणार. हे सगळे संचालक कोट्यावधी प्रॉपर्टी चे मालक आहेत. त्यातील अनेकांचे गोठे सुद्धा नसतील. किंवा त्यांनी गायी म्हशीची गोठ्यात बसून धार ही काढली नसेल . कांहीच्या गायी म्हैशी असल्या तर त्या फार्म हौस मध्ये शो साठी असतीलही.गोकुळ चे 5000 ठराव धारक त्यांना निवडून देणार. ठराव धारकात कांहीचे घरचे नोकर, ड्राईव्हर, जावई, मेहुणा, पाहुणा असेही असतील.


    आता दुसरे चित्र पाहू.


गोठ्यात काम करून घाम्याघूम झालेला उत्पादक शेतकरी.  शेण काढायचं, डोकीवरून न्यायचं आणि लांब गारीवर . मालकीण पण मदत करते. कांही ठिकाणी गोठा गावात आणि शेणाची गार एक किलोमीटवरच्या शेतात.गाडा करून घरच्या महिलांनी ते शेतात नेऊन टाकायचे. .मग धारा काढायच्या. त्यात पोरं बी तयार. सगळं कुटुंब कामात.हे झाल्या शिवाय चूल पेटत नाही. मग चहापाणी, नाष्टा.पोरांचा डबा वगैरे.


    तिसरे चित्र पाहू 


  डेरीत दुधाचे कॅन न्यायचे. डिग्री लावून फॅट तपासायचे.पशु खाद्य गोकुळ संघाचे. पोत उचलायचं सायकलवर टाकायचे. घरात येऊन कडबा कुटी च मशीन सुरू करायचे.दुधाच्या बिलातून कर्जाचे हप्ते भरायचे.गोठ्यात धुरी करायची. जनावरांना डास, चिंलटं, साप, किरडू यांच्या पासून जपायचे.


          चौथे चित्र.


    ठराव धारक मजेतअसतो.रोज वडा पाव,मिसळ वर ताव मारतो. कुठली म्हस आणि कुठली गाय.कायम कानाला मोबाईल आणि गाडीच्या गियर वर पाय. सायबाचा फोन कवा वाजंल कळायचं न्हाय.


     उत्पादकाना गोकुळची हंडी लयी उंचा वर. फोडणारा फोडतोय, लोणी चाखणारा चाखतोय. एखादा उष्टा थेंब पडलाच बाजूला तर उत्पादक आ करून जिभेवर झेलतोय.


     गोकुळ चं चित्र हे असं आहे.

आनंदाराव पाटील चुयेकर हे सगळं आकाशातील स्वर्गातून पहात असतील. श्रीकृष्णाला म्हणतं असतील.


" कन्हैया  ,मी निर्माण केलेलं गोकुळ पृथ्वीवर कुठं आहे मला दाखवशील.? "





              ------------------------