गोकुळचे गौड बंगाल. चाणक्य नीती च्या राजकारणात कोण धनवान , कोण कंगाल.

Kolhapur news
By -

 

              


            कोल्हापूर न्यूज  /  वि.रा.भोसले



   कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ या संस्थेला सद्या फार मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. गोकुळच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमुळे तर या संस्थेची चर्चा महाराष्ट्रभर सुरू आहे.


 अमुल ही देशातील एक अग्रगण्य दूध संस्था मानली जाते.त्या पाठोपाठ गोकुळचा क्रमांक लागतो असेही मानले जाते.सध्या गोकुळची निवडणूक मोहीम जोरात सुरू आहे. निवडणुकीचे आडाखे बांधणाऱ्या सर्वांचे तर्क पाण्यावर छडी मारल्यासारखे झाले आहेत.नुसत्या लाटा.याला दुसऱ्या शब्दांत 'गोकुळचे गौडबंगल 'असेही म्हणता येईल.



       मुंबईत बसलेल्या आकांनी म्हंटल्या प्रमाणे गोकुळची निवडणूक महायुतीमार्फतच लढवली जाईल असे मानले जाते.महायुती मध्ये भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट ) हे तीन प्रमुख पक्ष आहेत.गोकुळ चे एकूण 25 संचालक निवडून द्यावयाचे आहेत. युतीमध्ये मोठा भाऊ कोण? धाकटा भाऊ कोण?  असे राजकारण सुरू आहे. आता तर चाणक्य नितीने ही डोके वर काढले आहे असे दिसून येते. कांही घटना आणि वक्तव्यातून हे लक्षात येईल.पाहूया.



  ना.. मुश्रीफ म्हणतात राष्ट्रवादी हाच मोठा भाऊ आहे. शिवसेनेने तसे अजून काही जाहीर केलेले नाही. भाजपचे नेते ना.चंद्रकांत दादा म्हणतात आम्ही 25 च्या 25 अर्ज भरणार. भाजपच्या नेत्या शौमिका महाडिक म्हणतात  राजकारणात कोण कोणाचा शत्रू नसतो कोण कोणाचा मित्र नसतो.आमची मागणी किमान 9 जागांची आहे. 'म्हणजे मोठा भाऊ आम्हीच'.चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील म्हणतात आम्हाला मुश्रीफ मुक्त गोकुळ करायचे आहे. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे आहेत. मध्यंतरी कोणी अदृश्य शक्ती हळूच प्रकट होऊन गेली. तिची छाया न्यायालयाच्या भिंतीवर दिसली म्हणतात. न्यायालयाच्या प्रकाश झोतात ती नाहीशी झाली.म्हणजे महायुतीत सगळे कांही  आलबेल आहे असे दिसत नाही.



  आता थोडे नेट च्या पलीकडे काय चालले आहे ते पाहू. गोकुळमधले आधीचे ना.मुश्रीफ यांचे सहकारी असलेले आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी जिल्हाभर पक्षविरहित मतदान करा अशी मोहीम काढली आहे. त्यात मा.वि.आ आघाडीचा उल्लेख नाही. त्यांची मोहीम  दूध उत्पदकांनाही दिलासा देणारी आहे. बंटी पाटलांचे संघटन कौशल्य साऱ्या जिल्ह्याला परिचित आहे. कोल्हापूर महानगरपालिकेत त्यांनी महायुतीला घाम फोडला होता.हे सर्वाना माहिती आहे.गोकुळ च्या निवडणुकीत सुद्धा मातब्बर शिलेदारांची अवस्था  'पाण्यात धनाजी संताजी दिसतात की काय अशी त्यांनी करून ठेवली आहे. त्यांनी भाजपाच्या तंबूत सुद्धा डेरा टाकलेला दिसतोय. मुरगूडचे रणजितसिंह पाटील यांचे चिरंजीव विश्वजितसिंह पाटील यांच्या डिजिटल फलकावर  त्यांचे फोटो लागले आहेत. रणजितसिंह पाटील व ना. मुश्रीफ आधी गोकुळ साठी एकत्र आले होते. बंटी पाटील यांच्या दौऱ्यानंतर चित्र बदललेले दिसते.



     गोकुळ वर अनेक वर्षे आबाजी, दादाजी, बाबाजी असे तेच तेच चेहरे पाहून उत्पादक सुद्धा कंटाळलेले दिसतात.सद्या Gen Z चा जमाना आहे. त्यामुळे पुढच्या पिढीला मैदानात उतरवण्याचा कल असावा.याला चाणक्याची राजनीती असेही म्हणता येईल.अमुलशी तुलना करायची तर गोकुळ ची 'भाकरी परतण्याची वेळ 'आली आहे असे मुंबईकरांना सुद्धा वाटत असावे. कांही नेत्यांचे चार्टर्ड प्लेन रातोरात मुंबईकडे जातात हे सुद्धा भुवया उंचावयाला लावणारे आहे.असो 'Reading between the lines ' याला निश्चित कांही अर्थ असतो असे मानले तर गोकुळचे गौडबंगाल डोके खाजवायला लावते हे निश्चित.


या निवडणुकीत कोण धनवान होणार व कोण कंगाल होणार हे काळच  ठरवेल. दिवाळीच्या आधी दिवाळी पहायला मिळणार हे निश्चित.



                 --------------------------