कोल्हापूर न्यूज नेटवर्क
राज्य सरकारने शाळा, महाविद्यालये बंद करून गोरगरीब सर्वसामान्य दलित, आदिवासी, बहुजन कष्टकरी, भटके विमुक्त, मुस्लिम अल्पसंख्याक समूहातील मुलामुलींचे शिक्षण कायमचे बंद करण्याचा घाट घातला आहे. या विरोधात 'शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच'च्यावतीने राज्यव्यापी आंदोलन उभा राहतआहे. या आंदोलनाच्या तयारीसाठी आज कोल्हापूर येथे शिक्षण हक्क परिषद झाली. या परिषदेत महाराष्ट्रातील एकही जिल्हा परिषद, महानगरपालिका तसेच अनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालय बंद होता कामा नये यासाठी तीव्र लढा उभा करण्याचा निर्धार आज झालेल्या परिषदेत करण्यात आला. परिषदेच्या अध्यक्षस्थानी मंचचे निमंत्रक कॉम्रेड संपत देसाई होते.
सुरुवातीला या परिषदेचे आयोजक सुधाकर सावंत यांनी स्वागत आणि प्रास्ताविक करून या परिषदेचा उद्देश सांगितला. राज्य सरकार उपेक्षित वंचित समूहातील मुलांच्या शिक्षणाचा हक्क हिरावून घेत आहे. त्या विरोधात जो लढा उभारत आहे त्या लढ्याच्या तयारीसाठी ही प्रबोधन परिषद असल्याची त्यांनी सांगितले.
शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंचचे राज्याचे निमंत्रक संपत देसाई यांनी भूमिका मांडताना या राज्यातील एकही शाळा बंद होता कामा नये. जिथे गाव, वाडी, वस्ती, तांडा, नगर असेल तिथे शाळा असली पाहिजे. प्रत्येक वर्गाला व विषयाला स्वतंत्र शिक्षक मिळाला पाहिजे. याबरोबरच शिक्षणाचे खाजगीकरण आणि बाजारीकरण थांबवून राज्याने आपले नवे शैक्षणिक धोरण आखावे, शिक्षणावरचा खर्च जीडीपीच्या आठ टक्के करावा, केजी टू पीजी सर्वांना मोफत, सक्तीचे आणि गुणवत्ता पूर्ण शिक्षण सरकारी खर्चातून आणि सरकारी यंत्रणेतून मिळावे यासाठी ५ ऑक्टोबर पासून राज्यव्यापी आंदोलन होत असल्याचे सांगितले.
कॉम्रेड अंकुश कदम बोलताना म्हणाले हे आंदोलन राज्याचे शिक्षण धोरण ठरवणारे असेल. ते विद्यार्थी केंद्री असेल. शिक्षण आणि विद्यार्थी केंद्री अशी भूमिका घेऊन उभारणारे आंदोलन यशस्वी करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे.
यावेळी संजय वेतुरेकर म्हणाले हे आंदोलन कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग पुरते मर्यादित न ठेवता राज्यव्यापी करण्याच्या हेतूनेच उभा राहत आहे. त्यामुळे आपल्या दोन जिल्ह्यांची जबाबदारी वाढलेली आहे. आपण ती जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडूया.
यावेळी प्राथमिक शाळांचे राज्य समन्वयक भरत रसाळे यांनी हे आंदोलन आता निर्णायक लढा करूनच थांबेल अशी मांडणी केली.
पालक संघाचे दिलीप शिरगावे, सागर पाटील यांनीही मनोगत व्यक्त करून सरकारी शाळा टिकवण्यासाठी या लढ्यात आम्ही पालक शेवटपर्यंत राहू असे सांगितले.
यावेळी विजय देवणे, संजय तरडेकर शिवाजीराव परुळेकर, बाबुराव सोरटे, कृष्णा भारतीय, संभाजी बापट, प्रसाद पाटील, राजेंद्र कोरे, संतोष आयरे यांनीही मनोगते व्यक्त केली.
यावेळी स्मिता चव्हाण, सारिका शिंदे, हुमायून मुरसल, शफीक देसाई, डॉ नवनाथ शिंदे, संजय साठे, राजेंद्र यादव, प्रकाश मोरुस्कर, राजेश वरक,मारुती पाटील, बाळू जाधव, संजय पाटील, संजय कडगावे, उत्तम कुंभार दिलीप माने, विलास पिंगळे नंतर यांच्यासह पालक, विदयार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन उमेश देसाई यांनी तर आभार सम्राट मोरे यांनी मांडले.
-------------------------


