कोल्हापूर न्यूज नेटवर्क
राज्य शासनाने शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी सुरू केलेल्या पवित्र पोर्टलमधील काही तांत्रिक आणि धोरणात्मक त्रुटींमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी, खाजगी अनुदानित शाळा आणि नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या पात्र उमेदवारांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप करत या नियमांमध्ये तातडीने सुधारणा करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य विनाअनुदान कृती समिती राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी शिक्षणमंत्री व शिक्षण आयुक्तांकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त झालेले अनेक शिक्षणसेवक एक-दोन वर्षे सेवा केल्यानंतर नव्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध होताच पुन्हा परीक्षा देऊन आपल्या स्व-जिल्ह्यात नियुक्ती मिळविण्याचा प्रयत्न करतात. या प्रक्रियेत ते कार्यरत असलेली शाळा मध्येच सोडून देत असल्याने संबंधित शाळा व संस्थांवर मोठा प्रशासकीय आणि शैक्षणिक ताण निर्माण होत आहे.
विशेषतः खाजगी अनुदानित संस्थांना शिक्षक रिक्त झाल्यानंतर सुधारित आकृतीबंध, नवीन मान्यता, पवित्र पोर्टलवर रिक्त पदाची नोंद आणि विविध प्रशासकीय मंजुरीसाठी प्रदीर्घ प्रक्रिया पार पाडावी लागते. त्यामुळे संस्थांचा वेळ, आर्थिक संसाधने आणि मनुष्यबळ यांचा अपव्यय होत असून नवीन पात्र उमेदवारांनाही नियुक्तीसाठी अधिक काळ प्रतीक्षा करावी लागत आहे.
या संपूर्ण परिस्थितीचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्षाच्या मध्यावर शिक्षक बदलल्यामुळे अध्यापनात खंड पडतो, अभ्यासक्रम अपूर्ण राहतो आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर तसेच परीक्षेतील निकालावर विपरीत परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त झालेल्या शिक्षणसेवकांना किमान ठराविक कालावधीपर्यंत त्याच शाळेत सेवा देणे बंधनकारक करावे, सेवा हमी (बॉण्ड) किंवा निश्चित सेवा कालावधीची अट लागू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच एकदा पवित्र पोर्टलद्वारे नियुक्ती झालेल्या शिक्षकांना पुन्हा त्याच पोर्टलमार्फत भरती प्रक्रियेत सहभागी होण्यास प्रतिबंध करावा. नियमांचे उल्लंघन करून मध्येच सेवा सोडणाऱ्या शिक्षकांवर योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
शासनाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन पवित्र पोर्टलच्या नियमांमध्ये आवश्यक सुधारणा कराव्यात, अन्यथा शिक्षक भरतीतील पारदर्शकतेचा उद्देश बाजूला पडून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितालाच मोठा धोका निर्माण होईल, असा इशारा खंडेराव जगदाळे यांनी दिला आहे.
------------------------------

