१०५ वर्षांची परंपरा असलेल्या मुरगूडच्या पाटील घराण्यातील श्रीकृष्णाष्टमीला लोकोत्सवाचे स्वरूप.

Kolhapur news
By -

 

          



              कोल्हापूर न्यूज नेटवर्क



श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्याची परंपरा मुरगूडच्या पाटील घराण्यात 105 वर्षे सातत्याने सुरू आहे. भजन कीर्तन,प्रवचन,ग्रंथवाचन आणि हरिनामाचा गजर यामुळे जन्माष्टमीला लोकोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.


   शेतकरी संघाचे माजी अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील तसेच लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. सुहासिनीदेवी प्र. पाटील यांच्या निवासस्थानी श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


 स्व. हरिभाऊ पाटील यांच्या पश्चात जन्माष्टमी उत्सवाची परंपरा कै. विश्वनाथ राव पाटील, त्यांचे पुत्र कै. दिलीपसिंह, गोकुळ दूध संघांचे माजी चेअरमन रणजितसिंह,कै. अजितसिंह  व प्रविणसिंह यांनी आजतागायत सुरू ठेवली आहे.105 वर्षपूर्वीची श्रीकृष्णाची शेडूची अत्यंत रेखीव मूर्ती आजही पूजली जाते.


    आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रवचनकार ह.भ.प. श्रीकृष्ण देखमुख यांचे योगदान या उत्सवा ला लाभले आहे.याशिवाय कै. जिजू बुवा, कै. नंदीकर महाराज, ह भ प काजवे महाराज,, पंढरपूर हून टेंभुकर महाराज अशा थोर कीर्तनकारांनी भक्तीरसाची गंगा या उत्सवात वाहत ठेवली आहे.


     यदा यदा शी धर्मस्य ग्लानिर्भवती भारत.......



  या भगवतगीतेतील श्लोका नुसार धर्माच्या रक्षणासाठी आणि  दुष्टांच्या संहारासाठी श्रीकृष्णानी जन्म घेतला .त्यामुळे त्यांचा जन्मोत्सव भक्तीभावाने साजरा केला जातो. सर्व क्षेत्रातील लोक या उत्सवात सामील होतात. मुरगूडच्या या उत्सवात माजी उप पंत प्रधान स्व.यशवंतरावजी चव्हाण, स्व.देशभक्त रत्नाप्पाण्णा  कुंभार,महाराष्ट्राचे माजी मंत्री स्व. सदाशिवरावजी मंडलिक स्व. विक्रम सिंहजी घाटगे, ना.हसन मुश्रीफ इत्यादी मान्यवरांनी हजेरी  लावली आहे.



   उत्सवात अनेक कृष्ण भक्तांचा, विठ्ठल भक्तांचा सत्कार करण्यात आला. श्रीकृष्ण देशमुख यांच्यावर ह भ प राम तोरशे (वाघापूर )यांनी लिहिलेल्या 'ब्रम्हज्ञान योगी' या ओवीबद्ध चरित्र ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. उत्सवात सर्व भाविकांसाठी आठ दिवस चहा नाष्टा व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. भोजन तयार करणाऱ्या भगिनींच्या कर्णमधुर ओव्यांनी वातावरण भारावून गेले होते.



    ठीक 12वाजता कान्हाचा  जन्मोत्सव हरिनामाच्या प्रचंड गजरात संपन्न झाला.दिग्विजयसिंह पाटील व सत्यजितसिंह पाटील यांनी भक्तगणांचे स्वागत केले. आनंद घाटगे यांनी सूत्रसंचालन केले.



   

      

  ---------------------------------