गोकुळच्या निवडणुकीत महायुतीचा दोन हजार मताधिक्याने विजय होणार हे निश्चित आहे. तरीही इतका त्रास का झाला याचे उत्तर आजही अनाकलनीयच आहे, असे मत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.कागल येथे मतदार याद्यांचे पुनरीक्षण, गोकुळ दूध संघ निवडणूक, कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या नियोजनाच्या बैठकीत मंत्री मुश्रीफ बोलत होते.
ते म्हणाले, गाव- खेड्यातील छोट्या- छोट्या दूध संस्थांच्या अस्तित्वासाठी अगदी सहकार न्यायालयापासून उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाची दारे ठोठावावी लागली. “सत्यमेव जयते….” या भावनेने हा लढा देत राहिलो आणि आज गोकुळ दूध संघाची अंतिम यादी प्रसिद्ध झाली. एकही दूध संस्था त्यामधून बाहेर पडली नाही, याचा मला विशेष आनंद आहे.
मी सातत्याने सांगत होतो की ,आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत. आज सगळ्याच गोष्टी मी बोलणार नाही, असे ते म्हणाले. सत्याच्या या लढ्यामध्ये सबंध कोल्हापूर जिल्ह्यातून राष्ट्रवादीसह शिवसेना शिंदे गट, जनसुराज्य पक्ष या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि प्रमुखांनी भरभरून साथ आणि पाठबळ दिले. किंबहुना; संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यानेच या लढ्याला पाठिंबा दिला. त्यामुळेच हा लढा जिंकता आला. गावागावातील कार्यकर्त्यांनी मतदार याद्यांच्या पुनरिक्षण मोहिमेबद्दल सजग आणि सतर्क रहा एकही पात्र मतदार यादीतून बाहेर पडणार नाही याची दक्षता घ्या. दसऱ्याच्या आधीपासूनच गोकुळच्या ठरावधारकांनी सहलीवर जायची तयारी ठेवा. केडीसीसी बँकेच्या ठरावधारकांनीही वेळेवर ठराव दाखल करावेत, असेही ते म्हणाले.
----------------------

