कोल्हापूर न्यूज नेटवर्क
कोल्हापूर जिल्हा अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे, विपुल निसर्ग संपदा लाभलेली आहे, जिल्ह्याला धार्मिक तीर्थस्थळे, क्रीडा, व्यापार, उद्योग यांची गौरवी परंपरा आहे. कोल्हापूरचे समग्र, एकात्मिक ब्रॅण्डिंग करण्यासाठी कोल्हापूर महोत्सवासारखे उपक्रम राबवावेत, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.
राज्यपाल जिष्णु देव वर्मा हे कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील प्रमुख विकास प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड डॉ.कुलगुरू राजनिश कामत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जासमिन, राज्यपालांचे परिसहायक नवदीप अगरवाल, इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले, कोल्हापूरला फार मोठी गौरवी परंपरा लाभलेली आहे. येथील कुस्ती, कबड्डी, सारखे खेळ प्रसिद्ध आहेत. येथील वने समृद्ध आहेत. निसर्ग सौंदर्याने हा जिल्हा नटलेला आहे. इचलकरंजीचा कापड उद्योग, हुपरीचा चांदी उद्योग सातासमुद्रापार पोहोचलेला आहे. या ठिकाणी श्री अंबाबाई, श्री जोतिबा यासारखी तीर्थस्थळे आहेत. कोल्हापुरी गुळ, कोल्हापुरी चप्पल यासह अनेक कृषी उत्पादने, हस्तकलांचा मोठा लौकिक आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापूरला जागतिक नकाशावर प्रमोट करण्यासाठी त्याचे ब्रॅण्डिंग आवश्यक आहे त्या दृष्टीने कोल्हापूर महोत्सवासारखे महोत्सव अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतील. त्यासाठी विमानतळाची कनेक्टिव्हिटी अधिक वाढली पाहिजे.
सुदृढ समाज आणि निकोप समाजमन घडविण्यासाठी नशा मुक्त भारत आणि टीबी मुक्त भारत ही अभियाने प्रशासनाने अत्यंत व्यापकपणे राबवावीत, असे सांगून राज्यपाल वर्मा म्हणाले, व्यसनमुक्ती केवळ कायदे, पोलीस प्रशासन अथवा शासकीय उपाययोजनांपुरती मर्यादित नसून, निरोगी आणि व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा, कुटुंबाचा आणि समाजाचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. नशा मुक्त पिढी घडविणे हे आज फार मोठे आव्हान आहे. नशा मुक्ती ला समाजातूनच नकार निर्माण झाला पाहिजे, समाजातील खेळाडू, कलाकार, प्रभावी व्यक्तिमत्वे यांनीही या कार्यात पुढे येऊन जनजागृती व प्रबोधनासाठी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्ह्यात राबविण्यात येत असणाऱ्या महत्त्वाच्या प्रकल्पांचे सादरीकरण जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले. महापालिकेतर्फे डॉ.राजेंद्र भारूड यांनी केले. तर जिल्हा परिषदेतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.जासमिन यांनी केले. यामध्ये महामार्ग विकास, राज्यस्तरीय रस्ते विकास, विमानतळ विस्तार, सांस्कृतिक वारसा आणि तीर्थक्षेत्र विकास, श्री महालक्ष्मी अंबाबाई विकास आराखडा, श्री क्षेत्र जोतिबा विकास आराखडा, शिक्षण, संशोधन आणि प्रशासन यामधील विविध उपक्रम, वैद्यकीय पायाभूत सुविधा, पुर नियंत्रण आणि प्रदूषण मुक्तीसाठीचे प्रकल्प, प्रस्तावित कोल्हापूर आयटी पार्क, पवणार ते पत्रादेवी महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग, विभागीय क्रीडा संकुल आधुनिकीकरण आणि विस्तार, आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, रिंग रोड व चार पदरी उन्नत मार्गीका, वैभववाडी- कोल्हापूर रेल्वे मार्ग प्रकल्प आदी विषयांबाबतचे सादरीकरण जिल्हाधिकारी यांनी केले.
संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, राजर्षी शाहू खासबाग मैदान, राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळ, मेकॅनिकल कार पार्किंग, रंकाळा म्युझिकल फाउंटन, ॲस्ट्रो टर्फ हॉकी स्टेडियम, श्री अंबाबाई मंदिर पार्किंग आणि भक्तनिवास यासह शहराच्या विविध सौंदर्यकरणाचे उपक्रम, कोल्हापूर इलेव्हेटर कॉरिडॉर, घनकचरा व्यवस्थापन आणि प्रक्रिया प्रकल्प, जीआयएसबेस्ड मालमत्ता सर्वे आदी विषयांबाबतचे सादरीकरण महापालिका आयुक्त यांनी केले. प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील जिल्हा परिषदेचे विविध उपक्रम, पिजीआय ग्रेडिंग, समृद्ध शाळा पिंक रूम उपक्रम याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सादरीकरण केले.
यावेळी राज्यपाल वर्मा यांनी पिंक रूम उपक्रमाचे कौतुक करून याची गरज व महत्त्व अधोरेखित केले. तसेच आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात उभी करण्यात आलेली ट्रान्सजेंडर यांची रेस्क्यू टीम या संकल्पनेचेही राज्यपाल महोदयांनी कौतुक केले.
--------------------


