मुंबई : देशाचे संविधान आणि लोकशाही व्यवस्था वाचवण्यासाठी आज आम्ही मैदानात उतरलो आहोत. देशामध्ये पुन्हा एकदा संविधान बदलण्याचे आणि संविधानाने निर्माण केलेली लोकशाही व्यवस्था संपवण्याचे षडयंत्र रचले जात आहे. काँग्रेस पक्ष आणि त्यांच्याशी संबंधित घटक एका आंतरराष्ट्रीय षडयंत्राअंतर्गत हे प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या 'लोकशाही वाचवा, अराजकता हटवा' मोर्चातून ते बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत लढण्याचा निर्धार व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात 'गव्हर्नमेंट चेंज' आणि 'रेजिम चेंज' या दोन संकल्पनांमधील फरक स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणुकीच्या माध्यमातून एक सरकार बदलून दुसरे सरकार आणण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र, 'रेजिम चेंज' म्हणजे केवळ सरकार बदलणे नसून संपूर्ण राजकीय व्यवस्था, संविधान आणि देशातील विविध संस्थांची रचनाबदलण्याचा प्रयत्न असल्याचा दावा त्यांनी केला.
काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून वारंवार 'रेजिम चेंज, रेजिम चेंज'चा नारा दिला जात असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते म्हणाले, "गव्हर्नमेंट चेंजचा अर्थ एक सरकार बदलायचे आणि दुसरे सरकार आणायचे, असा आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला हा अधिकार आहे. मात्र, रेजिम चेंजचा अर्थ राजकीय व्यवस्था बदलणे, संविधान बदलणे आणि देशामध्ये उभ्या असलेल्या सर्व संस्था बदलणे असा होतो."
या दोन्ही संकल्पनांमधील फरक समजून घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. केवळ सत्तांतर आणि संपूर्ण व्यवस्था बदलणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सध्या देशात रेजिम चेंजच्या माध्यमातून संविधान आणि लोकशाही व्यवस्थेला लक्ष्य केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
---------------

