कोल्हापूर न्यूज / वि.रा.भोसले
दुसऱ्या महायुद्धा नंतर अमेरिका आणि रशिया या महाशक्ती उदयास आल्या. रशियात झारशाही संपून लाल राजवट उदयास आली.त्यावेळी एका कवीने आईन्स्टाईन वर एक काव्य लिहिले. त्यातली एक ओळ आज महायुतीला लागू पडते.
ऐक टापा ऐक आवाज
लाल धूळ उडते आज.
दुसऱ्या महायुद्धा मुळे ब्रिटिशांची जगभरातील सत्ता कमकुवत झाली. तशी भारतातील सत्ता सुद्धा डळमळली. स्वातंत्र्य चळवळीला ही बळ आले आणि ब्रिटिशांना देश सोडावा लागला. काँग्रेस सत्तेवर आली.नेहरू, इंदिरा, राजीव, सोनिया, आणि आता राहुल प्रियांका या घराणेशाही मुळे बलशाली काँग्रेस सुद्धा ढेपाळली.
शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष दादांच्या बंडामुळे उजाड झाला असतांनाही विधान परिषदेच्या (MLC ) निवडणुकीत महाराष्ट्रतील 5 जागा पैकी 3 जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. त्यात शरद पवार ना 2आणि काँग्रेसला नागपूरची पदवीधरची 1 जागा मिळाली.महायुतीला पुणे व अमरावती येथील फक्त 2 शिक्षक आमदार मिळाले.सत्तेचे गणित चुकले कुठे.?
या निवडणुकीत दोन गोष्टीनीं सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
1. नो EVM.सर्व निवडणुका मतपत्रिके (Ballet ) वर झाल्या.त्यामुळे व्होट चोरी चा कांगावा करायला वाव नव्हता.
2. नागपूर म्हणजे भाजपचा बालेकिल्ला. नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस या दिग्गज नेत्यांच्या समोर कॉग्रेस ने पदवीधर मधून वंजारी यांची आमदारकी खेचून आणली.
महाराष्ट्रा बरोबर यु पी, बिहार, कर्नाटक मध्ये मिळून 28 जागात एकही काँग्रेस ला मिळाली नाही. त्यामुळे नागपूर चा पराभव महायुतीला अंतर्मुख करायला लावणारा आहे.शिक्षक मतदार संघात सुद्धा शिंदे सेनेने बंडखोरी केल्याचे दिसून आले. उदय सामंत, प्रकाश आबीटकर आणि शंभूराजे देसाई या शिवसेनेच्या मंत्र्यांनी सानप यांचा (बंडखोर) उघड प्रचार सुरू केला होता.म्हणजे महायुतीत सर्व कांही आलबेल नाही.
कोल्हापूर ची गोकुळ ची सत्ता सुद्धा महायुती तील गोंधळा मुळे गेली आहे. सत्ता ही सेवेसाठी असते. घराणेशाही वाचवण्यासाठी नाही हे गोकुळच्या मतदारांनी दाखवून दिले.
महायुती मधील अतिविश्वास आणि आणि परस्पर मतभेद यामुळे गोकुळ गेलं,नागपूरही गेलं.असं म्हणायला हरकत नाही.
म्हणून आईन्स्टाइन वरील कविता येथे आठवते. फरक फक्त शब्दांत आहे.
'ऐक टापा ऐक आवाज
'युती' त धूळ उडते आज.'
NEET, MPSC, परीक्षा जंतर मंतर,यामुळे बिथरलेली Gen Z सुद्धा अजुन चाकोरीत आलेली दिसत नाही. पदवीधर च्या तिन्ही जागा कदाचित त्यामुळेच महाविकास कडे सरकल्या असाव्यात.
ग्रामीण भाषेत सांगायचे तर 'उलागलेल्या शेतात सुद्धा नवी पालवी फुटली आहे.'
तिसरं एक उदाहरणही महत्वाचं आहे. गोकुळच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी होणाऱ्या मिटींग वर महायुतीने बहिष्कार टाकला आहे. बंटी पाटील यांचा म्हणजेच काँगेस चा अध्यक्ष होणार ही बाब युतीला झोंबणारी आहे.वास्तविक गोकुळ ही स्थानिक स्वायत्त सहकारी संस्था आहे. ती पक्षविरहितच असली पाहिजे. बंटीनीं ती तशीच लढवली आहे. तिला राजकीय पक्षाचा टिळा लाऊ नये. मिटिंग वर बहिष्कार म्हणजे रवीचा डाव ठरणार आहे. आज ना उद्या अध्यक्ष निवड होणारच आहे. त्यासाठीचा निर्णय मुंबईत नव्हे तर कोल्हापूरातच व्हायला हवा. महायुती ने ही बाब पण लक्षात घ्यायला हवी.
गोकुळ आणि नागपूर ने एक धडा घालून दिला आहे. सत्तेचे गणित कुठेतरी बिघडत चाललंय.
सावध होण्याची हीच वेळ आहे.
--------------------------

