'त्या' वेळी दिसला नाही राधासुता धर्म ? ना. मुश्रीफ यांच्या वक्तव्यावर जनतेत नाराजीचा सूर.

Kolhapur news
By -

 

        


      कोल्हापूर न्यूज  /  वि.रा.भोसले



कुरुक्षेत्रावर 14 दिवसांचे कौरव पांडवांचे घनघोर युद्ध सुरू होते. भीष्माचार्य द्रोणाचार्य यांच्यासारखे महारथी धारातीर्थी पडले होते.तेव्हा अर्जुना समोर महारथी कर्ण युद्धासाठी उभा राहिला. ऐन युद्धात त्याच्या रथाचे चाक भूमित रूतले. त्यातही दोन्ही बाजूंनी अभिमंत्रित बाणांचा वर्षाव सुरू होता.त्यावेळी कर्ण सारथी असलेल्या श्रीकृष्णांना म्हणाला.


  "रथाचे  रुतलेले चाक काढतो. तोपर्यंत शस्त्रे  थांबवा. मी निशस्त्र आहे.. निःशस्त्र योद्ध्यावर शस्त्र चालवणे धर्मविरोधी आहे. "



 "व्वा कर्ण व्वा! भर दरबारात द्रौपदीचे  वस्त्रहरण सुरू होते. ती मदतीसाठी आकांत करत होती. तेंव्हा तिला मदत करण्या ऐवजी तिची टर उडवत होतास.एका असहाय्य स्त्रीचे तू रक्षण करू शकला नाहीस. तेंव्हा कोठे गेला होता राधासुता तुझा धर्म?"


श्रीकृष्णांचे हे उद्धार कागलच्या राजकारणात एखाद्या धुक्यासारखे पसरत आहेत.


    गोकुळच्या निवडणुकीत ना. हसन मुश्रीफ यांच्या मुलाचा म्हणजे नावीद मुश्रीफ यांचा  पराभव झाला.  पराभवाचा हा घाव त्यांच्या वर्मी लागला. व कोल्हापुरी जनतेच्या कधी मनात सुद्धा आले नव्हते ते ना. मुश्रीफ बोलून गेले. त्यावर सोशल मीडियावर देखील अनेकांनी सक्त नाराजी व्यक्त केली.तिचा सूर असा होता.  


    '"साहेब 30 वर्षे आम्हीं जात पात धर्म न पाहता तुम्हांला निवडून देत आलो. राजर्षी शाहूंच्या विचारांचे आम्ही पाईक आहोत. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आम्हांला दैवता समान आहेत. जातीयवाद केला असता तर 30 वर्षांपूर्वीच तुमचे राजकारण संपले असते. तुम्हीं विकास केला म्हणून जनता तुमच्या पाठीशी राहिली. मुलगा निवडणुकीत पडतो तेंव्हा तुम्हांला जातीय वाद सुचतो. हा कागल आणि करवीरच्या जनतेचा अवमान आहे.एखाद्या सम्राटा प्रमाणे तुमचा विजयी अश्व दौडत राहिला. आडवे येणाऱ्यांना तुम्हीं येन केन प्रकारे  दाती तृण धरावयास लावले . तेंव्हाही आम्हीं पाठीशी राहिलो.तेंव्हा आम्हीं धर्म नाही पाहिला. आमच्या  सफेद वस्त्रांवर आपण चिखल उडवला.

 असं बोलायला नको होतं.

    तुम्हांला काय एकटे बंटी पाटील असे  म्हणतात असे नाही. ज्यांना तुमचे शब्द वर्मी लागले ते सर्व म्हणतात. गोकुळ हे फक्त निमित्त झाले.


13 चे बहुमत असतांना ही केवळ एका मताच्या अंतराने आपण बंटी पाटील यांचा नव्हे तर सर्व सामान्य दूध उत्पादक शेतकरी वर्गाचाच अवमान केला.

 

आता म्हणे शासन नियुक्त चार संचालक येणार आहेत. म्हणजे ते महायुतीचेच असणार. त्यात कदाचित नाविद मुश्रीफ,आणि सौ.शौमिका महाडिक या पराभूत उमेदवारांची सुद्धा नावे असतील.

  म्हणजे दूध उत्पादकांच्या नाका वर टीच्चून तुम्हीं तुमचा अध्यक्ष करू शकाल. कदाचित नावीद सुद्धा होऊ शकतील.."


    जनमानसात हे धुके स्थिर होऊ लागले आहे.त्यांना कांही दिसेनासे झाले आहे.म्हणून भगवत गीतेतील श्रीकृष्णांचे हे वाक्य काही ना आठवले असेल.. ते शब्दश : आपल्याला लागू पडेल असे नाही.पण सूर तर तसाच दिसतो.


     गोकुळचा पराभव मोठया मनाने स्विकारला असता तर तुमची , देवा भाऊं आणि चंद्रकांत दादां यांची प्रतिमा सुद्धा अधिक उजळली असती.


      विजयी होण्यापेक्षा पराभव पचवण्यात मोठेपण असतं.त्यातून आणखी गड जिंकता येतात. हे  छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्रालाच काय पण साऱ्या जगाला दाखवून दिले आहे. उगीच जगभरातील विद्यापीठातून त्यांचे राज्यशास्त्र  शिकविले जात नाही.युतीला त्यांचा अभिमान असावा असे गृहीत धरायला हरकत नाही.



                       ---------------------