कोल्हापूर न्यूज नेटवर्क
कोल्हापूर:- महाराष्ट्र सरकारने राज्यात गेल्या अनेक वर्षापासून समाजकल्याण खात्यामार्फत चालू केलेली अनुसूचित जातीच्या भूमिहीनांना जमीन देण्याची कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमानी सबलीकरण योजना ही त्यामध्ये असलेल्या जाचक अटीमुळे फक्त कागदावरच ठेवून त्या योजनेवर राखून ठेवलेला निधी इतरत्र वळवत असल्याचा आरोप करून सदर योजना ही लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्यव्यापी लढा आता निर्णायक वळणावर असल्याची माहिती पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा सुभाष वायदंडे यांनी कोल्हापूर येथील बिंदू चौकात नि दर्शनानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिला.
प्रा. वायदंडे या योजनेसंदर्भात पुढे म्हणाले की, या योजनेमध्ये बागायत एक एकरासाठी आठ लाख रुपये व जिरायत एक एकरासाठी पाच लाख रुपये देण्याची तरतूद असून फार हस्यास्पद ही बाब आहे. कारण बाजार भाव तीस ते चाळीस लाख बागायतीचा व जिरायतीचा पंधरा लाखापर्यंत आहे. कोणताही शेतकरी आठ लाखाला व पाच लाखाला जमीन देण्यासाठी तयार नसतो म्हणून शासनाने विभागवार बाजारभावाप्रमाणे जमिनीच्या दराची निश्चित किंमत ठरवावी . शिवाय लाभार्थी या योजनेपासून दूर राहावा म्हणून लाभार्थीला त्याच गावातील जमीन घेण्याची अट घालण्यात आली आहे.तरी पण एखाद्या लाभार्थ्याने जर त्याच गावातील शेतकरी तयार केला तर समाजकल्याणचे अधिकारी व त्या गावातील तलाठी त्या गावातील समाजामध्ये जाऊन समाजामध्ये सर्वांना सांगतात व नोटीस लावतात की या गावातील व्यक्तीची जमीन विकायची आहे प्रत्येकाने अर्ज करा आणि एकापेक्षा जास्त अर्ज आले तर नंतर ड्रॉ पद्धतीने दिली जाते. खरा लाभार्थी हा कष्ट करून दूर राहतो. त्यामुळे या योजनेचा लाभ कष्ट करणाऱ्या ला मिळत नाही. पत्रकार परिषदेमध्ये पुढे बोलताना वायदंडे म्हणाले जिल्ह्यातील कोणत्याही गावांमध्ये लाभार्थ्याला जमीन घेता यावी अशी सवलत असणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.
शासनाला जर ही योजना प्रभावीपणे राबवायची असेल तर शासनाने प्रत्येक गावातील निबंधकाकडे होणारे खरेदी-विक्रीचे जमिनीचे व्यवहार 20 टक्के हे या योजनेसाठी राखून स्वतःकडे घ्यावेत किंवा प्रत्येक गावांमध्ये शिल्लक असणारी गायरान जमीन या योजनेसाठी वाटप करावी. सदर योजनेला दिली जाणारी 50 टक्के सबसिडीची मर्यादा काढून ही योजना जर प्रभावीपणे राबवायची असेल तर राज्यातील विभागवारबाजारभावाप्रमाणे लाभार्थ्याला रकमेची शासनाने तरतूद करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.
वरील मागण्या मान्य करून घेण्यासाठी पुरोगामी संघर्ष परिषदेच्यावतीने राज्यव्यापी लढा उभारणार असून त्याची पहिली पायरी राज्यातील प्रत्येक तहसीलदारांना निवेदने दिली जाणार असून त्यानंतर प्रत्येक जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले जाणार आहेत. आणि शेवटी पुरोगामी संघर्ष परिषदेचे कार्यकर्ते व पदाधिकारी आम्ही वाटेगाव ते मुंबई पदयात्रा काढणार असल्याचे म्हटले आहे.
यावेळी पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्य सल्लागार कमिटीचे अध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब साठे राज्य प्रवक्ते पांडुरंग रणदिवे राज्य सरचिटणीस युवराज तात्या सोनावले प्रदेश महामंत्री मारुतीराव बोभाटे राज्याचे कार्याध्यक्ष नितीनभाऊ तुपे पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा सौ स्वाती सौंदडे पश्चिम महाराष्ट्राच्या संपर्कप्रमुख श्रीमती शोभा पारधे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख लखन वायदंडे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्रकाश वायदंडे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अमोल लांडगे कोल्हापूर जिल्हा ग्रामीण चे अध्यक्ष अमोल सोनावळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
