आमदार जयंत आसगावकर यांच्याकडून माध्यमिक शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची खरडपट्टी ; अधिकाऱ्यांची केली कान उघाडणी; एजंटगिरी थांबवण्याच्या सूचना

Kolhapur news
By -

                   


  

                   कोल्हापूर न्यूज नेटवर्क


वेतननिश्चिती, फंडाची रक्कम, वैद्यकीय बिलांची रक्कम आदी कामांसाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधिकारी पैसे घेतात, ही अतिशय गंभीर बाब आहे. अशा भ्रष्ट अधिकारी व कर्मचार्यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करा, अशा सक्त सूचना आमदार जयंत आसगावकर यांनी शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांना दिल्या. कामात टाळाटाळ करणाऱ्या आणि एजंटांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना यावेळी आमदार जयंत आसगावकर यांनी धारेवर धरले.

कोल्हापूर पे युनिट कार्यालयातील प्रलंबित कामाचा आढावा आणि थकित बिलाबाबत चर्चा करण्यासाठी आज, गुरुवारी आमदार जयंत आसगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे बैठक पार पडली. या बैठकीला माजी आमदार भगवानराव साळुंखे, कोल्हापूर शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड, कोल्हापूर मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ, शिक्षक नेते के. के. पाटील व उदय पाटील, कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील, मुख्याध्यापक संघाचे सहसचिव अजित रणदिवे, लोकल ऑडीटर इरफान अन्सारी, श्रीकांत पाटील, जुनी पेन्शन कोअर कमिटीचे कार्याध्यक्ष सुदेश जाधव, शिक्षकेतर महामंडळाचे उपाध्यक्ष श्रीधर गोंधळी, राजेंद्र सूर्यवंशी, विष्णू पाटील, प्रशांत पोवार, सनी नलावडे आदी उपस्थित होते.  

वेतन निश्चिती, फंडाची रक्कम वैद्यकीय बिलाची रक्कम मिळण्यासाठी भविष्य निर्वाह निधी पथक (पे युनिट) शिक्षण समिती येथे वारंवार हेलपाटावे मारावे लागत असल्याची तक्रार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांनी आमदार जयंत आसगावकर यांच्याकडे केली होती तसेच याबाबतीत दैनिकातही बातम्या छापून आलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार जयंत आसगावकर यांनी तातडीने बैठक बोलवली. या बैठकीला अधीक्षक प्रवीणकुमार फाटक, लेखाधिकारी भंडारी, सहाय्यक लेखाधिकारी दिलीप कलगुटकी, वावरे, खाडे हे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार जयंत आसगावकर म्हणाले, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात एजंटगिरीची चलती सुरू आहे. या एजंटांना अधिकारी वर्ग पाठीशी घालत आहेत. या एजंटाशिवाय बिले मंजूर होत नसल्याचे वास्तव्य आहे. एखाद्या शिक्षकाने चार वेळा बिले देऊनही त्यात त्रुटी निघत असतील, तर ती शिक्षण विभागासाठी लाजिरवाणी बाब म्हणावी लागेल. शिक्षकांनी दिलेली बिले चेकलिस्टप्रमाणे असतात. त्यात जर त्रुटी असतील, तर ती एकदाच कळवावी. वारंवार शिक्षकांना बोलवून त्यांना त्रास देऊ नका, अशी सूचना आमदार जयंत आसगावकर अधिकाऱ्यांना केल्या. 

        आमदार जयंत आसगावकर पुढे म्हणाले, शिक्षण विभागात चुकीचे काही होत असेल, तर त्याला माफी नाही. फाईल गहाळ होणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. आलेली सर्वच थकीत बिले 8 ते 10 दिवसात निर्गमित करा. 10 दिवसानंतर पुन्हा या कामांचा आढावा घेतला जाईल. जर त्यातही त्रुटी राहिल्या तर त्या संबंधित अधिकाऱ्यांची हयगय केली जाणार नाही. शिक्षण विभागात कामासाठी येणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सन्मान द्या, त्यांची कामे वेळेत करा, दलालांना प्रवेश नाकारा, सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी करा, अशा सूचना यावेळी जयंत आसगावकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी उपस्थित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शिक्षण विभागातील भोंगळ कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. अशा अधिकाऱ्यांवर लक्ष देऊन कारवाई करा, अशी मागणी आमदार जयंत आसगावकर यांच्याकडे केली.

प्रस्तावात वारंवार त्रुटी काढून पैशाची होणारी मागणीमुळे वादग्रस्त ठरलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाला शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी चांगलेच फैलावर घेतले. चुकीचे काही होत असेल तर सुट्टी देणार नाही असा सज्जड दमही त्यांनी भरला. विभागाच्या कामकाजात सुधारणा झाली नाही तर प्रसंगी शिक्षणाधिकाऱ्यांविषयी तक्रार करू असेही सुनावले. जवळपास एक तासहून अधिक वेळ चाललेल्या या बैठकीत प्रश्नांच्या भडिमारामुळे उत्तरे देताना अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली.


      गेले काही दिवस माध्यमिक शिक्षण विभागाचा कारभार  गाजत होता. विभागातील काही कर्मचारी प्रस्तावात त्रुटी दाखवत पैशाची मागणी करत असल्याच्या तक्रारी झाल्या. या साऱ्या पार्श्वभूमीवर आमदार आसगावकर, माजी आमदार भगवानराव साळुंखे यांच्या उपस्थितीमध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत  विविध विषयावर चर्चा झाली . 

👇

https://youtu.be/vWyzwaU-OlI?si=PF_qR5CR8YAhHA15