कोल्हापूर न्यूज नेटवर्क
संजय मंडलिकांना लीड द्या आणि पाच कोटींचा निधी मिळवा अशी ऑफर खासदार धनंजय महाडिक यांनी कागल तालुक्यातील मतदारांना दिली आहे. ते कागल येथील प्रचार सभेत बोलत होते.
धनंजय महाडिक यांनी कागल आणि चंदगड या दोन तालुक्यांमध्ये अनोखी शर्यत लावली आहे. महाडिक म्हणाले, कागल तालुक्यात हसन मुश्रीफ आणि स्वतः संजय मंडलिक आहेत. तर चंदगड तालुक्यातही चांगली परिस्थिती आहे. यामुळे संजय मंडलिक यांना कोणत्या तालुक्यातून जास्त मताधिक्य मिळतंय पाहू. मी सर्वांना आवाहन करतो की चंदगड तालुक्यापेक्षा तुम्ही कागल तालुक्यातून जास्त लीड दिलं तर पाच कोटी रुपयांचा अधिकचा निधी देऊ. चला तर मग लागली शर्यत... यामध्ये मी आणि संजय मंडलिक आम्ही दोघेही आहोत. मी अडीच कोटींचा निधी देणार आणि संजय मंडलिक अडीच कोटी देतील. या शर्यतीत आम्ही दोघे आहोत हे ध्यानात ठेवा, नाहीतर तुम्ही उद्या मला एकट्याला धराल.धनंजय महाडिक म्हणाले, राज्यात आणि देशात आमचं सरकार आहे, त्यामुळे निधी मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

