महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त कागलमध्ये सत्यशोधक पद्धतीने विवाह संपन्न ; समाजापुढे ठेवला आदर्श

Kolhapur news
By -

    

        





      कोल्हापूर न्यूज  / कागल प्रतिनिधी


गुरुवारी सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती या मुहूर्तावर कागलच्या सिद्धार्थ टूर अँड ट्रॅव्हल्स आणि महात्मा बसवेश्वर  ट्रॅव्हल्सचे मालक सिद्धार्थ नागरत्न यांचा चिरंजीव संकल्प आणि इचलकरंजी येथील  श्रीधर कुंडले यांची मुलगी प्रा. श्रुती यांचा विवाह सत्यशोधक पद्धतीने संपन्न झाला. याच दिवशी स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. अशा प्रकारचा विवाह करून नागरत्न आणि कुंडले कुटुंबीयांनी समाजापुढे आदर्श ठेवला आहे.

         गुरुवारी महात्मा फुले यांच्या जयंती दिवशीच वर संकल्प आणि वधू श्रुती यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांची वेशभूषा परिधान करत  मंगल कार्यालयात प्रवेश करताच वधू-वरांच्यावर उपस्थितांनी  फुलांचा वर्षाव करून त्यांचे स्वागत आणि अभिनंदन केले.

याप्रसंगी वरपिता सिद्धार्थ नागरत्न आणि आई स्वाती नागरत्न तसेच वधूचे पिता श्रीधर कुंडले व आई स्नेहा   कुंडले यांनी तसेच वर संकल्प आणि वधू श्रुती यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या सत्यशोधक विवाह सोहळ्यात कोणताही बडेजाव नव्हता.विवाहातील अनावश्यक गोष्टी टाळण्यात आल्या होत्या.

   प्रा. सौरव देसाई म्हणाले  महात्मा फुले यांनी २५ डिसेंबर १८७३ मध्ये महाराष्ट्रात पहिला सत्यशोधक विवाह पुरोहिताशिवाय घडवून आणला. या विवाहाचा सर्व खर्च सावित्रीबाई यांनी केला होता. याबद्दल त्यांना खूप त्रास सहन करावा लागला होता. आजही सत्यशोधक विवाह ही काळाची गरज आहे. अतिशय साधी ,सरळ आणि सोपी विवाह पद्धत महात्मा फुले यांनी १९ व्या शतकात दाखवून दिली. आम्हा बहुजनांना ती आजही माहिती नाही. असे त्यांनी सांगितले.

     प्रा. भास्कर चंदनशिवे यांनी सत्यशोधक विवाह पद्धतीमध्ये अनिष्ट प्रथा, मानपान, परंपरा आणि अनावश्यक खर्चाला फाटा देत साध्या सोप्या पद्धतीने पुरोहिताशिवाय विवाह सोहळा संपन्न झाला. आजही तरुणांमध्ये जागरूकता निर्माण होऊन सत्यशोधक पद्धतीचा विवाह करण्याकडे कल वाढत आहे. सामाजिक काम करणारा युवक वर्ग अशा पद्धतीचा विवाह करून आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करत त्यामुळे आज विनाविधी रजिस्टर पद्धतीने विवाह होत आहेत.

स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचालन माजी प्राचार्य भास्कर चंदनशिवे यांनी केले.

या विवाह सोहळ्यास सुस्मित नागरत्न, सर्वेश कुंडले, अनिल पोवार, मोहन सोरटे, आनंदी सोरटे, यांच्यासह बहुजन समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


सत्यशोधक विवाह प्रसंगी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेच्या पूजन प्रसंगी वर संकल्प वधू श्रुती आणि त्यांचे माता पिता.