मुंबई : भाजपला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असणारा ठाणे लोकसभा मतदार संघ हवा आहे. यावरून जागावाटपाचे घोडे अडले आहे. ठाणे हा एकनाथ शिंदे यांच्या अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे तो आपल्याकडेच रहावा, अशी शिवसेनेची इच्छा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जागावाटपाच्या चर्चेला सुरुवात होण्यापूर्वीच भाजपने शिवसेनेपुढे कल्याण किंवा ठाणे या दोन्हीपैकी एका मतदार संघाची निवड करण्याचा प्रयत्न ठेवला होता. कल्याण हा एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा मतदार संघ आहे. फडणवीस यांनी यापूर्वीच या मतदार संघातून त्यांची उमेदवारी घोषित केली आहे. पण श्रीकांत यांनी आपल्या पक्षाने म्हणजे शिवसेनेने अद्याप आपल्या नावाची येथून उमेदवारी घोषित केली नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीविषयीही सवाल उपस्थित केला जात आहे.

