गोविंदा आले...त्यांनी पाहिले... त्यांनी जिंकले ...

Kolhapur news
By -

 

             


              कोल्हापूर न्यूज  / वि. रा. भाेसले


   शिवसेनेच्या प्रचारासाठी सिनेस्टार गोविंदा आले.त्यांनी पाहिले आणि त्यांनी जिंकले.

     तमाम तरुणाईच्या आणि सिनेरसिकांच्या हृदय सिंहासनावर कित्येक वर्षे विराजमान राहिलेले बॉलीवूड चे प्रख्यात अभिनेते गोविंदा मुरगूड मध्ये जेंव्हा आले तेंव्हा त्यांच्या स्वागता चे वर्णन फक्त वरील तीन शब्दात करता येईल.

    ज्युलिअस सिझर बद्दल ते वापरले जायचे.

  He came. He saw. He conquered... 

     त्यांच्या साठी विशेष संरक्षण व्यवस्था अशी नव्हतीच.त्याची त्यांना तशी गरजही नव्हती.तरी दहाबारा तरुणांनी त्यांना अगदी साखळी करून व्यासपीठावर आणले.

    त्यांनी भाषण सुध्दा केले.मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे.आज देशाला त्यांच्या  नेतृत्वाची गरज आहे.विश्वाला सुध्दा आहे.

    त्यांच्यासाठी आपले अनमोल मत मागायला आलोय .शिवसेनेच्या संजय मंडलिक यांना दिल्लीला पाठवू म्हणजे मोदीही बळकट होतील.असा त्यांच्या भाषणाचा आशय होता.शिवभक्त असलेल्या गोविंदा यांच्या विनम्र स्वभावामुळे सभेला चांगला रंग आला.

     पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांनी सभेला संबोधून भावुक आवाहन केले. स्व.सदाशिवराव मंडलिक यांच्या ऋणातून मुक्त होण्याकरिता कागलच्या या सुपुत्राला या मतदारसंघातून  दीड लाखाचे मताधिक्य देऊया असे आवाहन त्यांनी सभेला केले.

      आमदार अमोल मिटकरी , भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे,शिवसेना जिल्हा प्रमुख राजेखान जमादार यांनीही आपले विचार मांडले.

      सभेला आसपासच्या तीस ते चाळीस गावातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

    व्यासपीठावर गोकुळ चे माजी अध्यक्ष रणजित सिंह पाटील,शेतकरी संघाचे अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील,अविनाशदादा पाटील,माजी नगराध्यक्ष व नगरसेवक यांची उपस्थिती होती.उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांनी प्रभावी शैलीत विकास कामांचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकसित भारताच्या संकल्पनेचा आढावा घेतला.

        सूर्यदेव जणू खांद्यावर हात टाकून बसलेले असताना श्रोत्यांनी तीन तास उष्णतेशी केलेला सामना कौतुकास्पद होता.