कोल्हापूर न्यूज नेटवर्क
"रवींद्र धंगेकर पुण्याचे आमदार आहेत, त्यांना स्टंट करण्याची सवय लागली आहे. दोन दिवसांच्या आत त्यांनी माफी मागितली नाही तर बदनामीचा दावा दाखल दाखल करणार आहे. कारण, 11 ते 24 मे दरम्यान मी परदेशी दौऱ्यावर होतो. ही घटना घडली तेव्हा मी इथे नव्हतो. वैद्यकीय शिक्षण विभागाचा कारभार हाती घेतल्यानंतर ससूनमध्ये ही तिसरी घटना घडली. ललित प्रकरणात ठाकूर यांना पदमुक्त करण्यात आले. दुसरी घटना उंदीर प्रकरणीही चौकशी समिती नेमली. आता हे तिसरं प्रकरण आहे. धंगेकरांनी माझ्याबाबतीत माहिती घ्यावी. येणाऱ्या लोकसभेत त्यांचा पराभव होणार आहे हे माहित असल्याने ते स्टंटबाजी करत आहेत", अशी टीका मुश्रीफ यांनी केली आहे.
ससून रुग्णालयातील घोटाळ्याप्रकरणी धंगेकर यांनी मंत्री हसन मुश्रीफांवर आरोप केले आहेत. ते म्हणतात ,"मी गेल्या एक वर्षापासून यावर बोलत आहे. पण सरकार अशा लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. या खात्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी डॉ. अजय तावरे या व्यक्तीला त्या पदावर बसवण्याचे काम केले आहे. मुश्रीफ असं वागत असतील तर यांच्याकडून काय अपेक्षा करायची. हा प्रचंड मोठा घोटाळा आहे. हे सरकारच घोटाळेबाज आहे. अजय तावरे हा गेल्या अनेक वर्षांपासून रिपोर्ट बदलणे असले काम करत आला आहे. हसन मुश्रीफ यांच्या आशीर्वादाने हा प्रकार सुरू आहे", असा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला होता.

