मुंबई : लोकसभा निवडणुकीतील पराभव भाजपला दिसत आहे, लोक आता राम राम करत आहेत. म्हणूनच त्यांना आज उद्धव ठाकरेंची भीती वाटत आहे. त्यामुळे ते मला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. मला संपवण्यासाठी आता त्यांचे केवळ रणगाडे, अणुबॉम्ब आणायचे राहिलेत. मोदी आतापर्यंत मै अकेला सबपे भारी असे म्हणत होते. पण आता तेच मला सर्वजण संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा कांगावा करत आहेत. अरे मोदीजी तुम्ही सर्वशक्तिमान, विश्वगुरू तुम्ही आणि तुम्हाला उद्धव ठाकरेंची भीती वाटते. ही कसली शक्ती तुमची? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला.
लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्रातील 5 व्या व अंतिम टप्प्याचे मतदान सोमवारी होणार आहे. या टप्प्याच्या प्रचाराचा तोफा आज थंडावल्या. तत्पूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 4 सभांचा धुरळा आज मुंबईत उठला. त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे व सत्ताधारी नेत्यांवर टीकेची झोड उठवली. त्यामध्ये ते बोलत होते .

