मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेससोबत जाण्याची वेळ आली तर मी माझा पक्ष बंद करेन असे विधान केले होते. त्यामुळे आता त्यांची ही इच्छा पूर्ण करण्याची वेळ आली आहे, असे त्या म्हणाल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी मुंबईतील शिवाजी पार्कवर सभा झाली. या सभेच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रथमच मोदींसोबत एका मंचावर आले. ही सभा झाल्यानंतर शर्मिला ठाकरे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यात त्यांनी मतदारांना दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा पूर्ण करण्याचे आवाहन केले. तसेच भविष्यात महाराष्ट्राचे भविष्य उज्ज्वल असल्याचाही दावा केला.

