कोल्हापूर न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या आशीर्वादाने ससून रुग्णालयामध्ये ते दोषी दोन डॉक्टर काम करत होते, असा आरोप केला होता. या आरोपानंतर मुश्रीफ यांनी रवींद्र धंगेकर हे स्टंटबाजी करत असून काही खोटे आरोप माझ्यावरती करत आहेत. त्यामुळे त्यांनी दोन दिवसांच्या आत माफी मागवावी, अन्यथा अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचे सांगितले होते.
यावर पत्रकारांशी बोलताना आमदार धंगेकर म्हणाले, अब्रु नुकसानीचा दावा त्यांनी दाखल करावा, परंतू माझ्याकडे त्यांना देण्यासाठी काहीच नाही, असे सांगितले. धंगेकर म्हणाले, हसन मुश्रीफ हे ज्येष्ठ नेते आहे. मात्र ते राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना सोडून पळून का गेले? हे सर्वांनाच माहिती आहे. ते आदरणीय आहेत, त्यामुळे मी त्यांची माफी नाही तर त्यांना दंडवत घालीन त्यांच्या पाय पडेन पण पुण्यामध्ये सुरु असलेली पब-संस्कृती संपली तर मी हे करेन.

