कोल्हापूर न्यूज /कागल प्रतिनिधी
खरी आणि वस्तुनिष्ठ बातमी दिल्याच्या रागातून मुरगुड येथील दैनिक सकाळचे पत्रकार प्रकाश तिराळे यांना मारहाण केल्याप्रकरणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे जिल्हाध्यक्ष आणि मुरगुड चे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तथापि त्यांना तात्काळ अटक करावी आणि त्यांचे जिल्हाध्यक्ष पद काढून घ्यावे या मागणीसाठी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने मागणीचे सह्यांचे निवेदन कागलचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे ,की बातमीदार प्रकाश तिराळे यांनी फक्त घडलेल्या घटनेचे वृत्तांकन केले होते . त्यांनी दिलेल्या बातमीत त्यांनी कोणाचेही नाव घातले नाही. असे असताना यांनी दिलेल्या बातमीचा राग मनात धरून गुरूवारी ता. ९ मे २०२४ रोजी सायंकाळी राजेखान जमादार आणि त्यांच्या साथीदारांनी तिराळे यांना मारहाण केली आहे.
पत्रकारिता आणि लोहशाहीला मारक ही घटना असून पत्रकारांवर दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. या घटनेचा कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनच्यावतीने आम्ही जाहिर निषेध करीत आहोत.समाजात अनेक घटना घडत असतात. त्याची माहिती संकलीत करून कार्यालयात पोहोचविण्याचे काम पत्रकार करत आले आहेत.त्यांना झालेली मारहाण म्हणजे पत्रकारिता आणि लोकशाहीवर केलेला हा हल्ला आहे. त्यामुळे राजेखान कादरखान जमादार व त्याला सहकार्य करणाऱ्या आसिफखान उर्फ मॉन्टी आसदखान जमादार, संदीप अशोक सणगर यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत तातडीने कडक कारवाई करण्यात येऊन त्यांना तात्काळ अटक करावी. त्याचबरोबर त्यांचे एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पद काढून घ्यावे. अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. पत्रकार प्रकाश तिराळे यांच्या बरोबरच त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे त्यामुळे त्यांना पोलीस संरक्षण मिळावे. असे हे निवेदनात म्हटले आहे.
याप्रसंगी भास्कर चंदनशिवे,सागर लोहार, तानाजी पाटील, कृष्णात माळी,नरेंद्र बोते,बा.ल. वंदूरकर, जहांगीर शेख, कृष्णात कोरे,कलंदर सनदी, विजय पाटील, विजय कुरणे, रवींद्र पाटील, नंदकुमार कांबळे,इम्रान मकानदार, फारुख मुल्ला, शिवाजी पाटील, बाबासाहेब चिकोडे, नामदेव गुरव, प्रशांत दळवी, सम्राट सणगर,जय चौगुले उपस्थित होते.
आपल्या मागणीची निवेदन पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांना देताना संघटनेचे प्रतिनिधी.


