मोहाली : 19 राष्ट्रीय रायफल्स (RR) युनिटचे आदरणीय कमांडिंग ऑफिसर कर्नल मनप्रीत सिंह यांना जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील लारकीपोरा, जलदुरा आणि कोकरनाग या अतिदहशतवादग्रस्त भागात नायक म्हणून स्मरण केले जाते.त्यांना शहीद होऊन 9 महिने झाले आहेत, पण त्यांचा 7 वर्षांचा मुलगा कबीर अजूनही त्यांच्या मोबाईलवर वडिलांना घरी येण्यासाठी व्हॉइस मेसेज पाठवतो. कबीरला वाटते की त्याचे वडील ड्युटीवर आहेत.
पंजाबमधील मोहाली येथे राहणारे कर्नल मनप्रीत सिंह यांची पत्नी जगमीत सांगतात की, मुलगा गुपचूप वडिलांना व्हॉईस मेसेज पाठवतो. तो म्हणतो, "बाबा, एकदा घरी या, त्यानंतर पुन्हा मिशनवर जा."
त्या सांगतात की पतीने घरात दोन चिनाराची झाडे लावली होती. त्यांच्या मुलांची नावे कबीर आणि वाणी ठेवण्यात आली. नवऱ्याने सांगितले होते की 10 वर्षांनी पुन्हा ही झाडे बघायला येऊ, पण आता....
जगमीत सांगतात की, त्यांचे पती काश्मीरमधील लोकांचे जीवन सुधारण्यासाठी नेहमीच तयार होते. अनेकदा त्यांना रात्री लोकांचे फोन यायचे आणि ते लगेच त्यांना मदत करायला निघायचे. कधी ते कुणाला दवाखान्यात घेऊन जायचे तर कधी कुणाला वैयक्तिक मदत करत असत.नवऱ्याला स्थानिक लोकांनी लग्न, मुलांचे वाढदिवस आणि ईद साजरी करण्यासाठी आमंत्रित केले होते ते सर्वजण त्यांच्या कुटुंबसारखे होते.