कोल्हापूर न्यूज नेटवर्क
जालना : राज्य सरकार ओबीसी आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेत नाही. भटक्या विमुक्तांना शाश्वत आरक्षण निघून जाते की काय, याची भीती आहे. याबाबत शासनाने चर्चा केली पाहिजे. राजकीय पक्षांनी, राजकीय पक्षाच्या नेत्यांना भूमिका घ्यायला सांगितले पाहिजे. यामधून मार्ग काढला पाहिजे. आम्ही आमची भूमिका अगोदरच स्पष्ट केली आहे. ओबीसी आरक्षणाचे ताट हे वेगळं असलं पाहिजे", असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची आंदोलनस्थळी भेट घेतली आहे. यापूर्वी आंबेडकर यांनी हाके यांची फोनवरून विचारपूस केली होती. मात्र गुरुवारी ते थेट लक्ष्मण हाके यांच्या भेटीला पोहोचले. यावेळी त्यांनी हाके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना किमान पाणी पिण्याचा आग्रह केला आहे. त्यांच्या विनंतीनंतर दोघांनीही पाणी घेतले. यावेळी राज्य सरकार हाके यांच्या उपोषणाबाबत गंभीर नसल्याचे म्हणत आंबेडकर यांनी टीका केली आहे. भेटीनंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.