हातात नोकरीची ऑर्डर : मोबाईलवर वडिलांच्या निधनाचा मेसेज ; सीईओंचा आधार

Kolhapur news
By -


        


                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क


       हातामध्ये नोकरीची ऑर्डर, जीवनातील अत्यानंदाचा क्षण आणि नेमके त्याच वेळी मोबाईलवर मेसेज आला वडिलांचे मृत्यू झाल्याचा.  मन सुन्न करणारी ही घटना. जुन्नर येथील हरिभाऊ दिगंबर विरणक या शिक्षकाला गुरुवारी एकाच वेळी हसू आणि आसू अशा स्थितीला  सामोरे जावे लागले. वडिलांच्या मृत्यूने धक्का बसलेल्या त्या शिक्षकाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी आधार दिला. शिक्षकाचे सांत्वन केले आणि वडिलांच्या अंत्यदर्शनाला जाण्यासाठी गाडीची व्यवस्था ही केली. सीईओंच्या या संवेदनशील आणि माणुसकीच्या वृत्तीचे दर्शन मुलाखतीसाठी आलेल्या उपस्थित शिक्षकांच्या मनालाही भावले. 

  कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत गुरुवारी 27 जून रोजी सर्किट हाऊस येते शिक्षक भरतीची प्रक्रिया आयोजित केली होती. पवित्र पोर्टल द्वारे निवड झालेल्या शिक्षकांना पदस्थापनासाठी बोलावले होते. समुपदेशनाने पदस्थापना करण्यात येत आहे. 

   समुपदेशन द्वारे पदस्थापनेची प्रक्रिया सुरू असताना शिक्षक हरीभाऊ दिगंबर विरणक यांच्या वडिलांचे निधन झाले असा मेसेज आला. समुपदेशन साठी आलेल्या शिक्षकांच्या वडिलांचे निधन झाल्याची माहिती सीईओ कार्तिकेयन एस  यांना  समजली. मुख्य कार्यकारी अधिकारी सभागृहाबाहेर आले.  त्या शिक्षकाचे सांत्वन केले. धीर दिला. आणि त्या शिक्षकांना स्वतःच्या गाडीतून पोहचविण्याचे नियोजन केले. स्वतः त्या शिक्षकाला घेऊन गाडीपर्यंत गेले. ड्रायव्हरला सूचना केल्या.

  मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेमन एस यांनी दाखविलेली संवेदनशीलता, माणुसकी आणि  तत्परता या साऱ्या गोष्टी मात्र उपस्थित शिक्षकांना मनापासून भावल्या.