कोल्हापूर न्यूज / वि.रा.भोसले
बार्बाडोस मध्ये भारतीय क्रिकेट संघाने इतिहास रचला.हातातून जवळ जवळ निसटलेला विजय शेवटच्या ओव्हर मध्ये अक्षरशः खेचून आणला.
रोहित शर्मा ,विराट कोहली ,बुंमराह यांनी क्रिकेटचा वर्ल्डकप मायदेशी आणला.
महाराष्ट्र शासनाची सुध्दा सद्या शेवटची ओव्हर सुरू आहे.
सगळ्या प्रकारचे बॉल टाकणे चालू आहे.महा विकासने चांगलीच टक्कर दिली आहे. बॅट पेक्षा बॉल भारी ठरला तर
विधान सभेचा कप जिंकायला सोपा आहे.
महाराष्ट्र शासनाचे त्रिकुट टिच्चून गोलंदाजी करताना दिसतंय.फिल्डींग एकदम टाईट आहे. दिल्ली बाऊंड्री वर सूर्या झेल घ्यायला टपून बसलाय.
खरंच महाराष्ट्राच्या राजकीय रणनितीचा रंग असाच दिसू लागलाय.
कप जिंकायलाच हवा म्हणून योजना बध्द फील्डिंग लावणं सुरू आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे.२१ ते ६० वर्षे वयाच्या सर्व पात्र महिलांना लाभ मिळणार आहे.अडीच लाखाहून कमि वार्षिक उत्पन्न असणाऱ्या बहिणींना त्याचा लाभ मिळेल.विवाहित,विधवा, घटस्फोटिता,परित्यक्ता,निराधार सर्व भगिनी यात आल्या.म्हणजे कुंकुम तिलक ,पदर वाल्या सह बुरखे वाल्या सुध्दा त्यात आल्याच.
सवलती देऊन मतं मिळतील अशी भाबडी कल्पना बाळगणाऱ्या शासन कर्त्यांनी जरा भूतकाळात डोकावून पहायला हरकत नाही.
सर्वच्या सर्व महिलांना एस टी बस चे तिकीट अर्धे केले. कार वाल्या महिलांना सुध्दा एस टी चा प्रवास सुखकर वाटू लागला.निम्मा मतदार संघ आता आपला झाला असे आपण मानले.
त्यांनी भावांना राख्या सुध्दा बांधल्या . मताच बटन मात्र दाबायला विसरल्या.
शेती कर्जे,व्याजे,बी बियाणे,मोफत राशन, सगळं कांहीं केलं .बटन मात्र दुसरंच दाबलं गेलं.
कर्नाटकात काँग्रेस ने महिलांना एस टी फुकट,वीज फुकट करून सुध्दा बटन मारून घेता आलं नाही.
वारकऱ्यांना इतक्या सोयी केल्या की त्यांनी तुमचं नाव घेऊन पांडुरंगाच्या पायावर डोकं टेकावे.
मतदानाच्या दिवशी हे सगळं गाठोड कुठेतरी वळचणीला ठेऊन दिलेलं असतं.
वळचण हाच शब्द भारतीय मतदारांना योग्य आहे.सत्तर वर्षे जातीपातीच्या राजकारणाने आपल्या मतदारांच्या राजकर्त्यांनी वळचणी करून ठेवल्या आहेत.
अमुक सेना ,तमुक सेना ,ब्रिगेड, आघाडी,मोर्चा,सभा ,गंध, टीळा,जानवं,शेंडी,फेटा,पगडी,टोपी,भगवा ,पिवळा,निळा,हिरवा झेंडा, मंदिर ,दर्गा,मस्जिद,गुरुद्वारा, बुद्ध स्तूप असं अनेक कंगोरे या लोकशाहीला आहेत.
सारासार विचार करून घटनेतील तरतुदी नुसार आपल्याला योग्य प्रतिनिधी निवडून द्यायचे असतात हे त्यांचा गावीही नसते.
गट तट बघून ,सहानुभूतीची लाट कशी आहे पाहून,फतवे आणि आदेश ऐकून व कधि कधि चतुष्पाद प्राण्यांच्या पेक्षा कमि किमतीला स्वतःला विकून मते देणारा मतदार आजही या लोकशाहीत पहायला मिळतो.
सवलती गेल्या चुलीत असे म्हणून जाती आणि धर्मासाठी काय करणार असे विचारणारा मतदार प्रत्येक राज्यात आहे.
अमेरिका ,इंग्लंड हे देश सुध्दा लोकशाही चालवतात.तिथला मतदार सुज्ञ आहे.उमेदवाराची पात्रता ओळखतो.
म्हणूनच भारतीय मूल असलेले ऋषी सूनक हे इंग्लंडचे पंतप्रधान व कमला हॅरिस या अमेरिकेच्या उपाध्यक्ष बनू शकतात.
ते त्या देशाशी एकनिष्ठ आहेत. तेथे 'ओवेसी' औषधाला सुध्दा मिळायचे नाहीत.
ते देश आर्थिक दृष्ट्या जसे संपन्न आहेत तशी लोकशाही सुध्दा विचार संपन्न आहे.
सुविधा,सवलती जरूर द्या पण भगिनींनी तुमच्या मनगटावर राखी बांधताना ते मजबूत असल्याची खात्री करून घ्यावी.
जीर्ण आणि दुबळ्या विचारांचा त्याग करून सशक्त लोकशाहीला सामोरे जाणारा मतदार तयार होईल तेंव्हाच विजयाचा कप जिंकता येईल.
घोडा मैदान जवळ आहे.

