कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये राज्य सरकारच्या वतीने महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून एका कुटुंबातील दोन महिलांनाच लाभ देण्यात येणार आहे. यातील एक विवाहित असेल आणि दुसरी अविवाहित असेल तरी देखील योजनेचा लाभ घेता येईल, असे देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. आम्ही कुटुंब नियोजन करून चूक केली का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. या प्रश्नाचे उत्तर देखील या माध्यमातून मिळाले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये सांगितले.
सेतू केंद्र आणि अंगणवाडी सेविकांना या योजनेमध्ये प्रति अर्ज पन्नास रुपये राज्य सरकार देणार असल्याची महत्त्वाची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
तर सेतू सुविधा केंद्राचा परवाना रद्द
ज्या सेतू सुविधा केंद्राच्या माध्यमातून महिलांची आर्थिक लूट करण्याचा प्रयत्न केला जाईल किंवा तसा पुरावा मिळेल. त्या सेतू सुविधा केंद्राचा परवाना रद्द करण्यात येईल, असा कडक इशारा देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. या योजनेचे काम ऑफलाइन आणि ऑनलाईन देखील करण्यात आले आहे.
एक जुलैपासून ही योजना लागू झाली असून योजनेत अर्ज करण्यासाठी साठ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. साठ दिवसाच्या कालावधीत ज्या महिला अर्ज करतील, त्या महिलांनी एक जुलैला अर्ज केला आहे असे समजून दोन्ही महिन्याचे पेमेंट मिळणार आहे. तर ऑगस्ट महिन्यानंतर ज्या महिला अर्ज करतील, त्यांनी अर्ज केलेल्या दिनांक पासून त्यांना पैसे मिळणार आहेत .

