कोल्हापूर न्यूज / वि.रा.भोसले
अगदी सकाळी सोशल मिडिया वर एम डी रावण यांचा फोटो पाहिला.काळजात धस्स झालं.फोटो दोन कारणांसाठी येतात भिनंदन किंवा श्रद्धांजली.
एम डीं चा तो फोटो श्रद्धांजली चा होता.
ते तीन महिने आजारी असल्याचे ऐकले होते. वार्धक्य वेशीवर आलं की कांहीं किरकोळ आजार भेटीला घेऊन येतं.तसाच कांहिसा त्यांचा आजार असेल असं वाटलं.आज उद्या जाऊन पाहून येऊ असं ठरवलं होतं.आणि आज अचानक त्यांच्या श्रधांजलीचा फोटो पाहिला आणि मन विदीर्ण झालं.पूर्वी वि.स.खांडेकर आणि ना.सी. फडके या दिग्गज साहित्यिकांची वैचारिक जुगलबंदी वृत्तपत्रात यायची.
"कलेसाठी जीवन की जीवनासाठी कला."
एम डी रावण यांच्या जीवनात डोकावून पाहिलं तर या वैचारिक जुगलबंदी आठवण यावी.लोहार,सुतार ,सोनार यांची कला जीवनासाठी असते.चित्रकार ,शिल्पकार अशा कलाकारांचे जीवन हे फक्त कलेसाठी असतं.एम डी यांनी सारं जीवन कलेसाठी समर्पित केलं.आणि सारी कला हीच त्यांच्या उपजीविकेचे ही साधनं ठरले.त्यांनी दुसरा कांहीं व्यवसाय उद्योग केलाच नाही.
साधारण पन्नास वर्षापूर्वी मुरगूड मध्ये हॉलीबॉल चे भव्य सामने भगतसिंग मंडळा मार्फत भरायचे.एम डी हे हॉलीबॉल चे मोठे खेळाडू नव्हते.पण क्रीडे कडे सुध्दा त्यांनी एक कला म्हणून पाहिले.या आंतरराज्य स्पर्धांसाठी कोलकत्ता, बेंगलोर मुंबई हुन सुध्दा संघ यायचे.शिल्प कलेचे उत्तमोत्तम नमुने त्यांनी सादर केले.
कधि घोडा, कधि बकरा .
शिवरायांच्या पुतळ्याला प्रमाणबध्द आकार देतांना ते तीस चाळीस दिवस स्वतःला ही हरवून जायचे. त्यांच्या कोणतीही शिल्प कृतीमध्ये तिळमात्र दोष काढायला जागा नसायची.
त्यांच्या शिल्पकला कृति जम्मु काश्मीर आणि लडाख पर्यंत पोचल्या आहेत.सीमेवरच्या जवानांनी तेथे ठोकलेला तगडा सलाम मुरगूड पर्यंत पोचायचा.
त्यांचे संघटन कौशल्य सुध्दा अजब होते.कसल्या तरी कारणाने मुरगूड मध्ये दंगा सुरू होता.युवकांनी लाठ्या सरसावण्या पर्यंत लोन पसरले होते. सद्या जेथे आत्मरूप गणेश मंदिर आहे तेथे पेठेच्या तोंडावर जमाव पोचला होता.त्यावेळी गणेश मंदिर नव्हते.एम डी नी रस्त्यावर एक खडूने एक पांढरी रेघ मारली आणि पोरांना सांगितले की
"या रेघेच्या पुढे पाऊल टाकायचे नाही."
काय आश्चर्य .युवकांचा सारा जमाव तेथेच थबकला.
एम डी च्या शब्दात हुकूमत नव्हती ,अर्वाच्च भाषा नव्हती .एक नम्र आवाहन असायचे.मंडळाचे नाव सुध्दा एका क्रांतिकारकाचे होते.
'भगत सिंग '
संघटन असे जबरदस्त आणि शिस्त बद्ध होते की जिल्ह्यातील आणि राज्यातील राजकीय पुढाऱ्यांना सुध्दा त्याची दखल घ्यावी लागली.
राजकारणात ते फक्त सेवाकार्य भावनेने उतरले होते.त्यात सुध्दा शिस्त आणि कलात्मकता असायची.असे हे व्यासंगी आणि सर्व स्पर्शी नम्र व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड लुप्त झाले.
त्यांनी कलेला सजवले नटवले तसे क्रीडा आणि समाजसेवा यांनाही वेगळा आयाम दिला.मुरगूड परिसरातल्या हुतात्म्यांना त्यांनी अगदी राज्य आणि देश पातळीवर प्रसिध्दी मिळवून दिली.
कुस्ती,कब्बडी ,क्रिकेट साठी सुध्दा त्यांनी आयुष्य वेचले.त्यांनी सुरू केलेल्या कांहीं परंपरांना आज ही एम डी टच मिळावा हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल.
💐💐💐

