कोल्हापूर न्यूज नेटवर्क
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बुधवारी भारताला तिसरे पदक मिळाले. नेमबाज स्वप्नील कुसाळे याने पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कांस्यपदक पटकावले. स्वप्नीलने एकूण 451.4 गुण मिळवले. विशेष म्हणजे यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत तिन्ही पदके नेमबाजीतच जिंकली आहेत.
2015 मध्ये कुवेत येथे झालेल्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत स्वप्नील कुसळेने 50 मीटर रायफल 3 प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे. त्याने 59 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत गगन नारंग आणि चेन सिंग या नेमबाजांना पराभूत केले आहे.
पदक जिंकल्यानंतर स्वप्नील म्हणाला, 'मी देशासाठी पदक जिंकले याचा मला खूप आनंद आहे. फायनलच्या वेळी मी खूप घाबरलो होतो, माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते.
2015 मध्ये कुवेत येथे झालेल्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत स्वप्नील कुसळेने 50 मीटर रायफल प्रोन 3 प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते.
नातवानं ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर स्वप्नीलच्या आजीच्या आनंदाला पारावार उरलेला नव्हता. आज्जीचे डोळे आंनदाश्रृंनी भरले होते. त्या माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, लय चांगलं झालं... म्हाया नातवानं करुन दावलं, माझा नातू लय मोठ्ठा झाला... आमचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी हाय... लहानाचा मोठ्ठा झालाय, लहानपणापासून बाहेर गेलाय, लय चांगलं झालं..!
खाशाबानंतर स्वप्नील दुसरा खेळाडू
महाराष्ट्राच्या खाशाबा जाधव यांच्यानंतर वैयक्तिक ऑलिम्पिक पदक पटकावणारा स्वप्निल दुसरा मराठमोळा खेळाडू ठरला आहे. स्वप्नील मूळचा कोल्हापूरचा, ऑलिम्पिकमधील त्याच्या कांस्य भरारीनंतर अवघ्या महाराष्ट्राच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. अख्ख्या देशाच्या मुखी स्वप्नीलच्याच नावाचा जयघोष आहे

