कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुंबई :महाराष्ट्राचे निवासी असलेल्या परंतु अन्य राज्यातून बीएएमएस केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी आता राज्यातून प्रवेश मिळणार आहे, असा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर करून मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्याचे तात्काळ निर्देश दिले आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन राज्यातील विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा केली. यावेळी, राज्यातील मराठीचा मुद्दा सातत्याने मांडणाऱ्या राज ठाकरेंनी बीएएमसचे शिक्षण घेणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांचा प्रश्नही मुख्यमंत्र्यांकडे माडला होता. त्यावेळी, मुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ दखल घेऊन महाराष्ट्रातील बीएमएमएसच्या विद्यार्थ्यांला दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्राचे निवासी असलेल्या परंतु अन्य राज्यातून बीएएमएस केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी राज्याच्या कोट्यातून प्रवेश मिळत नव्हता. यासंदर्भात राज ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांना आयुर्वेद विद्यार्थ्यांवरील हा अन्याय दूर करण्यासाठी योग्य ती पाऊले उचलण्याचे सूचवले.
त्यासाठी, पदव्युत्तर प्रवेश नियमांत आवश्यक ते बदल करून मान्यतेसाठी प्रस्ताव लगेच सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. राज्याच्या 85% कोटा (शासकीय व खाजगी अनुदानित) तसेच 70% कोटा (खाजगी विना अनुदानित) या कोट्यातून प्रवेश घेण्यासाठी अन्य राज्यातून बीएएमएस केलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आता संधी मिळणार आहे.

