मंत्री हसन मुश्रीफांच्या नावाचा वापर करून निवृत्त शिक्षिकेला २० लाखाचा गंडा : पोलिस उपायुक्त बोलत असल्याचे सांगून अटक करण्याची दाखवली भिती

Kolhapur news
By -

  

          


  पुणे :निवृत्त वृद्ध शिक्षिकेला पोलिस उपायुक्ताच्या नावाने कॉल करून माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासाठी मनीलाँड्रींग केले आहे, असे सांगून तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तुम्हाला अटक करावी लागेल म्हणत २० लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.


याप्रकरणी तोतया पोलिस उपायुक्त नरेंद्र गुप्ता याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उषा मुरलीधर व्यास (71, रा. प्राईम रेसीडेन्सी, विठ्ठलनगर, हडपसर) यांनी याबाबत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उषा व्यास ह्या जेष्ठ नागरिक ३१ मे रोजी त्या घरात असताना त्यांना त्यांच्या मोबाईलवर पीएसआय नरेंद्र गुप्ता नावाच्या व्यक्तीचा फोन आला. त्याने व्यास यांच्याशी संवाद साधत तुम्ही माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासाठी मनीलाँड्रींग केले आहे. तसेच बेकायदेशीर पिस्तूल खरेदीसाठी पैसे पुरवून तुम्ही ड्रगचा व्यापार करत आहे म्हणत घाबरवले.हसन मुश्रीफ आमच्या ताब्यात असून तुमच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यात तुम्हाला अटक करावी लागेल, अटक झाल्यावर तुम्हाला मुंबई येथे ठेवण्यात येईल. तुमची पेन्शन बंद करण्यात येईल असे खोटे सांगून गुन्हा दाखल करण्यात आल्याची पीडीएफ पाठवली. त्याच्या बोलण्यामुळे व्यास ह्या घाबरल्या. त्यांनी गुप्ता नावाच्या त्या व्यक्तीला मी यातून कशी वाचेल अशी विचारणा केली. तेव्हा त्याने तुम्हाला यातून जामीन मिळू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्या खात्यात जेवढे पैसे असतील ते आमच्या खात्यात पाठवले लागतील ,असे म्हणत व्हेरीफिकेशन नंतर तुम्हाला पुन्हा पैसे परत करण्यात येईल असे सांगण्यात आले. गुप्ता नावाच्या व्यक्तीने पाठविलेल्या खात्यावर व्यास यांनी तब्बल २० लाख पाठविले.