काँग्रेस नेत्याचा पत्रकार परिषदेत बोलताना हार्ट अटॅकने मृत्यू ; बोलता - बोलताच खुर्चीवरुन कोसळले

Kolhapur news
By -

 

          


बंगळुरू - कर्नाटकातील एका काँग्रेस नेत्याचा पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधतानाच हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सी के रवीचंद्रन (वय ६३) असे या नेत्याचे नाव आहे. ते काँग्रेसच्या कुरूपा कम्युनिटी असोसिएशनचे अध्यक्ष होते.


   कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एका ट्विटद्वारे सी के रवीचंद्रन यांच्या निधनाची माहिती दिली. कर्नाटकच्या राज्यपालांनी सिद्धरामय्या यांच्याविरोधात म्हैसूर जमीन घोटाळ्याप्रकरणी खटला चालवण्याची परवानगी दिली आहे.


सी के रवीचंद्रन कर्नाटक राज्य मागासवर्गीय व अल्पसंख्याक संघटनेच्यावतीने याविरोधात बंगळुरु प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेत होते. तिथे त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि ते बोलता - बोलताच खुर्चीवरुन कोसळले. त्यांनी तिथेच अखेरचा श्वास घेतला. संविधान व लोकशाही वाचवण्याच्या या लढ्यात आमच्यासोबत असणाऱ्या रवीचंद्रन यांच्या निधनामुळे मला खूप दुःख झाले, असे सिद्धरामय्या यांनी त्यांच्या कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त करताना म्हटले आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.