मुंबई :राज्यातील उमेद अभियानातील बचत गटात कार्यरत असलेल्या महिला भगिनींनी आज वर्षा या निवासस्थानी उपस्थित राहून फुलं उधळत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले.राज्यतील ४० हजार गावातून एक कोटी राख्या पाठवण्याचा संकल्प या लाडक्या बहिणींनी केला असून त्याची सुरुवात आज वर्षा बंगल्यावर करण्यात आली. यापुढे टप्याटप्याने त्यांच्या राख्या मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत पोहोचणार आहेत.
राज्यातील प्रत्येक महिला भगिनीला रक्षाबंधनाच्या आधी प्रत्येकी तीन हजार रुपये देण्याचा प्रयत्न होता. त्यानुसार राज्यातील १ कोटी ४ लाख पात्र महिलांच्या खात्यात रक्षाबंधनाच्या आधी हे पैसे जमा झाल्याने हे रक्षबंधन एक वेगळाच आनंद आणि समाधान देऊन गेल्याची भावना उपस्थित लाडक्या बहिणीने याप्रसंगी व्यक्त केली.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या बहिणी या राज्याच्या विकासात मोठे योगदान देत आहेत. त्यांना आधार देण्यासाठी जे करता येईल ते सारे करेन . ही फक्त सुरुवात असून जसजशी आमची ताकद वाढेल तसतशी आर्थिक मदत वाढवू . या पैशांचा सदुपयोग करून आपण उद्योग करा. तुमच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत .


