कोल्हापूर न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज मोठी घोषणा केली. दहावी आणि बारावीच्या शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात होणार आहे. तर, दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या काळात होणार असल्याचे बोर्डाने सांगितले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळामार्फत दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात.
विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया वेळेवर होणे, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा या मंडळाच्या परीक्षेनंतर आयोजित केल्या जात असल्याने अशा परीक्षांचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा तसेच पुरवणी परीक्षा लवकर घेवून त्याचा निकाल लवकर जाहीर करणे, या बाबींचा विचार करुन सन 2025 ची फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणारी दहावी आणि बारावीची परीक्षा नेहमीपेक्षा 18 ते 10 दिवस आधी आयोजित करण्याचा मंडळाचा मानस असून त्याअनुषंगाने लेखी, प्रात्यक्षिक आणि इतर परीक्षा पुढील तारखांना घेण्याचे नियोजन असल्याचं मंडळाकडून सांगण्यात आलं आहे.
शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांसह विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी-मार्च 2025 च्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेच्या नियोजित तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व लेखी परीक्षांचे सविस्तर विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

