तुतारी हातात घेण्याची पूर्वतयारी ? शुक्रवारच्या मेळाव्याकडे लक्ष

Kolhapur news
By -

        

           


             

                कोल्हापूर न्यूज नेटवर्क

              

  राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्याकडून भाजपला लवकरच एक मोठा झटका मिळू शकतो. यामुळे कोल्हापूर मधील राजकीय समीकरणांची मांडणी नव्याने होणार आहे. कारण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील समजले जाणारे समरजीतसिंह घाटगे यांनी  मंगळवारी शरद पवार यांची भेट घेतल्याचे समजते. त्यामुळे त्यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील  प्रवेश निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. समरजीतसिंह घाटगे यांनी  शुक्रवारी २३ ऑगस्टला कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला आहे. या मेळाव्यात समरजीत घाटगे आपला निर्णय जाहीर करु शकतात.


मात्र, समरजीत घाटगे यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यास तो भाजपसाठी मोठा धक्का ठरेल.सूत्रांच्या माहितीनुसार, समरजीत घाटगे यांनी शाहू सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात समरजीत घाटगे हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्याबाबत कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतील, असे सांगितले जात आहे. प्रमुख कार्यकर्ते आणि  पदाधिकाऱ्यांना मंगळवारी रात्री उशीरा तसे निरोप पाठवण्यात आले आहेत. याशिवाय, गुरुवारी कोल्हापुरात महायुतीची जाहीर सभा होत आहे. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार आहे. तरीही समरजीत घाटगे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे समरजीत घाटगे यांचा शरद पवार गटातील प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे.

समरजीत घाटगे हे ३ सप्टेंबरला  शरद पवार यांच्या उपस्थितीत तुतारी हाती  घेतील , असे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून समरजीत घाटगे हे शरद पवार गटात जातील, अशी चर्चा होती. आगामी विधानसभा निवडणुकीत ते तुतारीच्या चिन्हावर कागल मतदारसंघातून अजितदादा गटाच्या हसन मुश्रीफ यांच्याविरोधात शड्डू  ठोकतील, असा अंदाज आहे.