कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मराठी साहित्यातील ज्येष्ठ साहित्यिक, निपाणीचे सुपुत्र महादेव मोरे यांचे आज पहाटे २१ ऑगस्ट २०२४ रोजी निधन झाले. सकाळी दहा वाजता त्यांच्या निपाणीतील माने प्लॉट येथील घरापासून अंत्ययात्रा निघणार आहे.
ग्रामीण मराठी साहित्यिक आणि लेखक महादेव मोरे यांचा जन्म २ एप्रिल १९३८ रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव महादेव भिकाजी मोरे आहे. ते आपल्या लेखनात ग्रामीण जीवनाचे वास्तववादी चित्रण करणारे एक महत्त्वाचे साहित्यिक होते . महादेव मोरे यांचे साहित्य समाजातील विविध समस्यांचे, विरोधाभासांचे आणि संघर्षांचे प्रभावीपणे चित्रण करते.
निपाणीतील प्राथमिक शिक्षणानंतर कोल्हापूरला अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत महाविद्यालयीन शिक्षण काही वर्षे गोखले कॉलेजमध्ये घेतले. तिथेच त्यांच्या साहित्य जीवनाची पायाभरणी झाली. असे ते आवर्जून सांगत असत. महादेव मोरे यांनी वयाच्या विसाव्या वर्षी १९५९ मध्ये कथालेखन सुरु केले. कॉलेजमध्ये असताना लिहिलेली 'म्हाईचा दिवस' ही त्यांची पहिली कथा. कादंबरी लिहून पहावी या उत्सुकतेने ते कादंबरी लेखनाकडे वळाले.
सतरा कादंबऱ्या, सतरा कथासंग्रह, चार ललित लेखसंग्रह नावावर असलेले हे लेखक उदरनिर्वाहासाठी पिठाच्या गिरणीत काम करत हाेते.
पिठाच्या गिरणीमध्ये काम करत असताना, डोळे उघडे ठेवून सभोवतालचं जग, हर तऱ्हेच्या व्यक्तींना आपल्या लिखाणातून जिवंत करणारे ते संवेदनशील लेखक होते.
ड्रायव्हर, क्लीनर, तृतीयपंथी, वारांगना, पंक्चरवाले, पैलवान, बारा बलुतेदार, निपाणीतले तंबाखू व्यापारी आदी घटकांना त्यांच्या कथांमध्ये स्थान असे. कष्टकरी समूहाचं प्रतिनिधित्व करणारे मोरे हे मोठे लेखक होते. पनोती, रैत, एकोणिसावी जात, चिताक, उड्डाळ, तिंगाड, झोंबडं, माणसं अशीही, प्रवाह अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली.
त्यांचे वडील टुरींग गाडीचा व्यवसाय करत. सुरुवातीला त्यांच्या हाताखाली काम शिकत शिकत ते गाडीने भाडी मारण्याचा व्यवसाय करु लागले. गाडीवर जाताना त्यांनी येणारे अनुभव लिहून ठेवायला सुरुवात केली. हेच लिखाण पुढारी, सकाळ, तरुण भारत अशा दैनिकांच्या पुरवणीमध्ये प्रसिद्ध होऊ लागले. याशिवाय प्रत्येक दिवाळी अंकात हमखास त्यांची कथा छापून येई. त्यांच्या कथेशिवाय सीमा भागातील सगळ्या वर्तमानपत्रांचे दिवाळी अंक अपूर्णच वाटत. सहज सोपी वाटणारी भाषाशैली, डोळ्यासमोर उभा राहणारे खुमासदार प्रसंग यामुळे महादेव मोरे हे सर्वसामान्य वाचकाला आपलेसे करत. पोटासाठी निपाणीमध्ये त्यांनी पिठाची गिरण चालवली. दिवसभर पिठाच्या धुळीत माखून गेलेला हा लेखक घरी आल्यावर दिवसभरात भेटलेल्या लोकांना आपल्या लेखणीतून जिवंत करायचा.

