विचारवंतांनी सत्तेच्या नव्हे तर सत्याच्या बाजूने बोलायला हवे ; डॉ. सुनीलकुमार लवटे, डॉ.विश्वास पाटील

Kolhapur news
By -

 


      

           कोल्हापूर न्यूज नेटवर्क

      

   पुणे :स्वतःचे व स्वकीयांचे हित बाजूला ठेवून अखिल मानवजातीचा विचार करणारे लोक खरे विचारवंत असतात. नैतिक मूल्यांचे अधःपतन होत असताना, वैयक्तिक लालसेपोटी सामान्य माणसाच्या वेदनेचा विसर पडलेल्या या काळात मानवतेच्या व लोकशाहीच्या रक्षणासाठी विचारवंतांनी ठाम भूमिका घेत सत्तेच्या नव्हे, तर सत्य आणि मानवकल्याणाच्या बाजूने बोलायला हवे असे परखड मत ज्ञानवंतांनी मांडले.


डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ पिंपरी आणि लोकशाहीसाठी समंजस संवाद यांच्यातर्फे 'ज्ञानवंतांचा सत्कार' सोहळा आयोजिला होता. सरस्वती सन्मानप्राप्त लेखक डॉ. शरणकुमार लिंबाळे, साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे, गांधी अभ्यासक प्राचार्य डॉ. विश्वास पाटील आणि लेखक प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार यांचा सत्कार डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते उल्हास पवार होते. नवी पेठेतील पत्रकार भावनात झालेल्या कार्यक्रमांमध्ये ज्येष्ठ पत्रकार संपादक अरुण खोरे उपस्थित होते . 


 डॉ. सुनीलकुमार लवटे म्हणाले, गांधी विरुद्ध आंबेडकर हा वाद अलीकडच्या काळात रंगवला गेला. प्रत्यक्षात गांधी आणि आंबेडकर यांच्यातील संबंध खूप चांगले होते. मंत्रिमंडळात आंबेडकरांचा समावेश असो की, राज्यघटनेच्या निर्मितीत महत्वाचे स्थान असो, गांधींनी कायम आंबेडकरांच्या प्रतिभेचा सन्मान केला. त्यामुळे आजच्य काळात गांधी अधिक आंबेडकर हा विचार घेऊन काम करण्याची गरज आहे. यामध्ये विचारवंतांनी या दोन महात्म्यांचे, त्यांच्या विचारांचे अभिसरण कसे होईल, यावर भर दिला पाहिजे. प्रस्थापितांनी उपेक्षित, दुर्लक्षित घटकांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.