कोल्हापूर न्यूज नेटवर्क
कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेली भीषण आग ही कोल्हापूरकरांसाठी आणि समस्त कलाकारांसाठी अत्यंत दुःखद घटना आहे .नाट्यगृहाचे झालेले नुकसान लवकरात लवकर भरून काढून ही वास्तू त्याच दिमाखात आणि डौलाने उभी करण्यासाठी माझ्या परीने सर्व प्रयत्न मी करेन असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाट्यगृहाची पाहणी केल्यानंतर दिले .
त्यांनी आगीमुळे नुकसान झालेल्या नाट्यगृहाची कोल्हापूर येथे पाहणी केली, त्यावेळी उपस्थित कलावंतांशी संवाद साधाला. ते म्हणाले, ऐतिहासिक वास्तूचे जसे बारकावे असतात तसेच पुन्हा करण्यासाठी या कामाला वेळ लागू शकतो परंतु कामे चांगली करण्यात येतील. लाकडी काम, दगडी काम आणि सिसम सारख्या लाकडांचा वापर करण्यात येणार असल्याने बारकावे लक्षात घेवून नाट्यगृह उभारण्याच्या सूचना प्रशासनाला त्यांनी दिल्या. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमकार दिवटे तसेच महापालिका प्रशासनाचे इतर अधिकारी उपस्थित होते.



