मुरगूड मध्ये नुकताच एक छत्री वाटप कार्यक्रम झाला.पावसाळा आहे.छत्री आवश्यकच असते.
छत्री कार्यक्रमात पुढील विधानसभेचे छत्र शोधायचा इरादा असावा असे या कार्यक्रमातील बरेचसे श्रोते म्हणतांना आढळले.
कारण सुध्दा तसेच होते.
कागल विधानसभा मतदार संघाचे इच्छुक उमेदवार समरजीतसिंह घाटगे व परवा लोकसभेच्या निवडणुकीत काठावरच्या मताधिक्याने पराभूत झालेले माजी खासदार संजयदादा मंडलिक हे व्यासपीठावर एकत्र होते.गोकुळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले होते.बिद्री कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील वाळवेकर हे ही होते.इतर अन्य मंडलिक व राजे गटाचे बरेच कार्यकर्ते उपस्थित होते.
सानिका स्पोर्ट्स ने गरीब विद्यार्थ्यांना छत्र्या ,रेनकोट व शालेय साहित्य वाटले.
विक्रमसिंह घाटगे यांच्या ७६ व्या जन्मदिना च्या निमित्ताने हा कार्यक्रम असला तरी त्यामध्ये भावी विधान सभेची गणिते मांडली जाणार हे आधीच माहिती झालेले असावे.त्यामुळे गर्दीही होती.
ना.मुश्रीफ यांनी म्हंटले आहे की
" मला पुन्हा ओट्यात घ्या."
म्हणजे मी निवडणूक लढवणार असून मला मतदारांंनी पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
महायुतीचे ते एक प्रभावी नेते आहेत.त्यामुळे त्यांच्या विधानाला वजन आहेच.
राजे समरजीतसिंह हे भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांनी स्वतः दोनदा निवडणूक लढवली आहे आणि राजे विक्रमसिंह घाटगे यांचे ते प्रभावी राजकीय वारसदार आहेत.
आता महायुतीचे तिकीट कोणाला मिळणार यावर बरेच अवलंबून आहे.
माजी आमदार संजय घाटगे यांनी आधीच ना.मुश्रीफ यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
कागलमधले बरेचसे कार्यकर्ते मात्र डोके खाजवत बसले आहेत.
त्यांच्यातील संवादाचे कांहीं नमुने पाहूया...
"अरे,संजय बाबांचा मुलगा पण इच्छुक आहे ना ?"
"तसं पाहिलं तर मुश्रीफ साहेबांचा मुलगा पण इच्छुक असणार."
" तिकडे गडहिंग्लज मधून स्वाती कोरी पण इच्छुक आहेत असं ऐकलं होत."
राजकीय घुसळण सुरू झाली आहे.लोण्याचा गोळा कोणाला मिळणार याची उत्सुकता आहे.
मागच्या वेळी तिहेरी लढत झाली.त्यात ना.मुश्रीफ निवडून आले आणि राजे दोन नंबर ला राहिले.
आता पुढे काय होऊ शकेल याचे तर्क सुरू झाले आहेत.
ना.मुश्रीफ यांनी महायुतीचे तिकीट मिळवण्यात बाजी मारली तर राजे समरजीतसिंह मग बंडखोरी करतील का ?
सध्याचे महाविकास आघाडीचे खासदार छ्त्रपती शाहू महाराज हे वतनदार मंडळींच्या मुजाऱ्याचे मानकरी आहेत. गादीचे वारस असल्याने त्यांना इतरांनी मुजरा करावाच लागतो.
त्यामुळे ते समरजीतसिंह यांना जवळचे आहेत.राजे विक्रमसिंह घाटगे यांचे बंधु तसेच कापशीकर घोरपडे सरकार, कोवाड,चंदगड चे वतनदार यांनी छत्रपतींना पाठींबा दिला होता.
चाळीस हजार पर्यंतचे मुस्लिम मतदार सुध्दा त्यांच्याच पाठीशी होते.
त्यामुळे ना.मुश्रीफ यांच्या बद्दल मंडलिक गटात नाराजीचे वातावरण आहे.
हे जाणकारांचे तर्क आहेत. पडताळुन पाहिले पाहिजेतच.
आणखी एक संवाद ऐकुया.
व्हयरे, कागलात मविआचा उमेदवार कोण असणार. मी मुश्रीफ यांचे मागे जाणार असे बाबांनी
जाहीर केलंय.म्हणजे ऊबाठा इथे कट झाला.काँग्रेस वाले कोल्हापुरात लढणार. म्हणजे शरद पवारांची तुतारी कागलात वाजणार का काय ?
व्हय,अगदी बरोबर.
आरं मग उमेदवार कोण ?
ते तुला काय करायचं !
यांच्यातला बंडखोर कोण असल तो तिकडं सरकणार किंवा दुसरा बघतील.
निवडून यायला पाहिजे नव्हं.
शाहू महाराज कसे आले ? ते येतील असं वाटत हुत का ? आलं नव्हं.
मुश्रीफ सायबांची वाट जरा मग बिकट म्हणायची.
तशी दोघांचीच झुंज हूनार .दोघांची बी वाट डांबरी रस्त्यावरन न्हाई हे खरं.
तुतारीची कुजबुज मात्र सुरू झालीय.
दगडु शेणवी हे भाजपचे पदाधिकारी आहेत.छत्री वाटप हे निमित्त तर नसेल ?
असही काहीना वाटतंय .
या छत्री खाली दडलंय काय
असं म्हणून बरेच कार्यकर्ते डोकं खरारा खाजवत आहेत.




